शेतकऱ्यांची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : उन्हाळा दिवसेंदिवस तीव्र होत असून नद्यांचे पाणी आटू लागले आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याबरोबरच जनावरांसाठीही पाण्याचा प्रश्न गंभीर होऊ लागला आहे. घटप्रभा उजवा व डाव्या कालव्याच्या काठावर शेकडो एकर शेतजमीन आहे. उन्हाळ्यामुळे विहिरी, कूपनलिकांचे पाणीही कमी होत आले असून शेतीला पाणी मिळविणे कठीण होत आहे. घटप्रभा डाव्या कालव्यात पाणी सोडल्यास या पाण्याचा शेतीला उपयोग होईल. अन्यथा उन्हामुळे पिके करपून जाण्याचा धोका अधिक आहे, असे निवेदनात म्हटले आहे. निवेदन देताना रयत संघ हरित सेनेचे राज्य अध्यक्ष चुन्नाप्पा पुजेरी, मानद अध्यक्ष शशिकांत गुरुजी, उपाध्यक्ष सुरेश परगन्नावर यासह नेते उपस्थित होते.









