शिलाँग (मेघालय) : येथील जवाहरलाल नेहरु स्टेडियमवर खेळविण्यात आलेल्या फिफाच्या आंतरराष्ट्रीय मित्रत्वाच्या फुटबॉल सामन्यात यजमान भारताने मालदिवचा 3-0 अशा गोल फरकाने एकतर्फी पराभव केला. या सामन्यात भारतीय संघातील प्रमुख खेळाडू सुनील छेत्रीने आपल्या वैयक्तिक फुटबॉल कारकिर्दीतील 95 वा गोल नोंदविला.
या सामन्यात मध्यंतरापर्यंत भारताने मालदिववर 1-0 अशी आघाडी मिळविली होती. भारताचे खाते बचावफळीतील राहुल भेकेने 34 व्या मिनिटाला उघडले. 66 व्या मिनिटाला लिस्टन कोलॅकोने हेडरद्वारे भारताचा दुसरा गोल केला. फुटबॉल क्षेत्रातील निवृत्तीचा निर्णय मागे घेवून या सामन्यात पुनरागमन करणाऱ्या सुनील छेत्रीने 76 व्या मिनिटाला हेडरद्वारे भारताचा तिसरा आणि शेवटचा गोल नोंदविला. कोलॅकोच्या पासवर छेत्रीने हा गोल केला. मालदिवला शेवटपर्यंत आपले खाते उघडता आले नाही. गेल्य्‰ 15 महिन्यांच्या कालावधीत भारतीय फुटबॉल संघाला आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये एकही विजय नोंदविता आला नव्हता.
आता भारतीय संघाला स्पेनचे मॅनेलो मार्कक्वेझ हे नवे प्रशिक्षक लाभले असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय फुटबॉल संघाचा हा पहिला विजय आहे. आता एएफसी आशिया चषक 2027 च्या पात्र फेरी स्पर्धेसाठी भारतीय फुटबॉल संघाचा पुढील सामना 25 मार्चला बांगलादेशबरोबर शिलाँगमध्ये होणार आहे. 286 दिवसांच्या विश्रांतीनंतर सुनील छेत्रीचे फुटबॉल क्षेत्रात पुनरागमन या सामन्यात झाले. छेत्रीचा हा 152 वा आंतरराष्ट्रीय सामना आहे. आतापर्यंत छेत्रीने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये वैयक्तिक 95 गोल नोंदविले आहेत. मालदिव विरुद्धच्या सामन्यात लिस्टन कोलॅकोला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. भारताच्या या सामन्यातील पहिल्या दोन गोलमध्ये कोलॅकोचा वाटा महत्त्वाचा ठरला आहे.









