तरीही पाकिस्तानपेक्षा स्थान मागेच : फिनलंड सर्वात आनंदी देश
वृत्तसंस्था/न्यूयॉर्क
संयुक्त राष्ट्रसंघाने गुरुवारी जगातील आनंदी देशांची यादी (वर्ल्ड हॅप्पीनेस रिपोर्ट 2025) जारी केली आहे. या यादीत एकूण 147 देशांना सामील करण्यात आले आहे. भारताला यात 118 वा क्रमांक मिळाला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत भारताच्या मानांकनात सुधारणा झाली आहे. 2024 मध्ये भारताला 126 वे स्थान प्राप्त झाले हेते. यंदा याप्रकरणी 8 स्थानांची सुधारणा होत भारत 118 व्या स्थानावर पोहोचला आहे. तर दुसरीकडे या यादीनुसार पॅलेस्टाइन, युक्रेन समवेत अनेक युद्धग्रस्त देशांचे लोक भारतीयांपेक्षा अधिक आनंदी आहेत.
फिनलंड पुन्हा एकदा जगातील सर्वात आनंदी देश ठरला आहे. फिनलंडने सलग आठव्या वर्षी स्वत:चे पहिले स्थान राखले आहे. या यादीत युद्ध, राजकीय अणि आर्थिक मुद्द्यांनी वेढलेले युक्रेन, इराण, मोझाम्बिक, इराक, पाकिस्तान, पॅलेस्टाइन, कांगो, युगांडा, गाम्बिया आणि व्हेनेझुएला यासारख्या देशांचे मानांकन भारतापेक्षा चांगले ठरविण्यात आले आहे.
यादीत पहिल्या पाच देशांमध्ये फिनलंड, डेन्मार्क, आइसलँड, स्वीडन आणि नेदरलँड यांचा समावेश आहे. तर सर्वात कमी आनंदी देश अफगाणिस्तान (147 वे स्थान) ठरला आहे. सिएरा लियोनला 146 वे, लेबनॉन 145 व्या, मालावी 144 आणि झिम्बाम्बेला 143 वे स्थान देण्यात आले आहे. हॅप्पीनेस निर्देशांकात ब्रिटनला 23 वे आणि अमेरिकेला 24 वे स्थान प्राप्त झाले आहे. यादीत पाकिस्तानचे मानांकन 109 आहे. पाकिस्तान भारतापेक्षा 9 स्थानांनी पुढे आहे.









