चीनच्या शत्रूदेशाने दिली ऑफर : दक्षिण चीन समुद्राच्या क्षेत्राकरता स्थापना
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
दक्षिण चीन समुद्रात फिलिपाईन्स हा देश सातत्याने चीनच्या अरेरावीला सामोरा जात आहे. याचमुळे आता फिलिपाईन्सने भारताला एक ऑफर दिली आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपानसोबत स्थापन करण्यात आलेली नवी रणनीतिक आघाडी ‘स्क्वाड’मध्ये भारताने सामील व्हावे अशी फिलिपाईन्सची इच्छा आहे. या आघाडीचा मुख्य उद्देश हिंद-प्रशांत क्षेत्रात चीनच्या वाढत्या अरेरावीला रोखणे आहे. चीन बेकायदेशीर आणि दबावाची रणनीति अवलंबून या भागात कृत्रिम बेटं आणि सैन्यतळ निर्माण करत आहे. भारत आणि दक्षिण कोरिया यासारख्या देशांनी या स्क्वाडमध्ये सामील व्हावे असे फिलिपाईन्सचे सैन्यप्रमुख जनरल रोमियो एस. ब्राउनर यांनी म्हटले आहे. चीनने दक्षिण चीन समुद्रात तीन कृत्रिम बेटं निर्माण केली आहेत, याच्या माध्यमातून चीन पूर्ण भागावर नियंत्रण मिळवत आहे. आगामी काळात चीन या पूर्ण भागावर कब्जा करू शकतो अशी भीती ब्राउनर यांनी व्यक्त केली आहे.
ब्राउनर हे नवी दिल्लीत आयोजित रायसीना डायलॉगमध्ये बोलत होते. यावेळी व्यासपीठावर त्यांच्यासोबत जपानचे सैन्यप्रमुख, भारतीय नौदलाचे प्रमुख, युएस इंडो-पॅसिफिक कमांडचे कमांडर आणि ऑस्ट्रेलियाचे संयुक्त संचालन प्रमुख उपस्थित होते. आम्हाला भारतासोबत समानता आढळते, कारण आमचा शत्रू एकच आहे. चीन आमचा शत्रू असल्याचे म्हणण्यास मला कुठलीच भीती नाही. याचमुळे सर्व प्रकरणांमध्ये परस्परांना सहकार्य करणे आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. फिलिपाईउन्सची यापूर्वीच भारतीय सैन्य आणि संरक्षण उद्योगासोबत भागीदारी असल्याचे ब्राउनर यांनी म्हटले आहे. स्क्वाड अद्याप एक अनौपचारिक समूह आहे, परंतु याचे सदस्य देश मागील एक वर्षापासून दक्षिण चीन समुद्रात संयुक्त सागरी मोहीम राबवत आहेत. दक्षिण चीन समुद्रात चीनच्या एकतर्फी दाव्यांना आव्हान देण्यासाठीच या समुहाची स्थापना करण्यात आली आहे. हिंद-प्रशांत क्षेत्रात चीनचा दबदबा रोखण्यासाठी भारत यापूर्वीच खास समूह ‘क्वाड’चा हिस्सा आहे. यात अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपानचा देखील समावेश आहे.
चीनच्या दाव्याला विरोध
पूर्ण दक्षिण चीन समुद्रावर चीन स्वत:चा दावा करत आहे. याप्रकरणी त्याने आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा निर्णयही फेटाळला आहे. फिलिपाईन्स, इंडोनेशिया, तैवान, मलेशिया, ब्रुनेई आणि व्हिएतनामसोबत चीनचा वाद सुरू आहे. दक्षिण चीन समुद्र हा सर्वात महत्त्वपूर्ण सागरी मार्गांपैकी एक आहे. या मार्गावरून दरवर्षी 3 ट्रिलियन डॉलर्सपेक्षा अधिक रकमेचा व्यापार होत असतो. या क्षेत्रात फिलिपाईन्स आणि जपान सातत्याने चीनच्या वाढत्या सैन्य उपस्थितीच्या आव्हानांना सामोरे जात आहेत.









