48 किलोमीटर अंतरापर्यंत घेणार शत्रूचा वेध : खासगी कंपन्यांकडून होणार निर्मिती
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
भारतीय सैन्याला लवकरच स्वदेशी आर्टिलरी गनने युक्त केले जाणार आहे. देशाच्या संरक्षण उत्पादन क्षेत्रात आत्मनिर्भरतेला चालना देण्यासाठी सरकारने 7 हजार कोटी रुपयांच्या कराराला मंजुरी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखालील सुरक्षा विषयक मंत्रिमंडळ समितीने स्थानिक स्वरुपात निर्मित 307 तोफांसोबत टोइंग व्हीकल्ससाठी 7 हजार कोटी रुपयांच्या व्यवहारावर शिक्कामोर्तब केले आहे. हा व्यवहार 307 हॉवित्झरसाठी असणार आहे.
या एटीएजीएस (अॅडव्हान्स्ड टॉड आर्टिलरी गन सिस्टीम) व्यवहारात 327 टोइंग ट्रक देखील सामील आहेत. चालू महिन्याच्या अखेरपर्यंत यासंबंधीच्या करारावर स्वाक्षरी होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 155 ममी/52-कॅलिबरच्या या तोफांचा मारक पल्ला जवळपास 48 किलोमीटर आहे. नव्या तोफांच्या खरेदीमुळे भारतात सैन्य आधुनिकीकरणाला बळ मिळणार आहे आणि यामुळे भारतीय सैन्याची सज्जताही वाढणार आहे.
सैन्याने 2017 पासून आतापर्यंत 720 दशलक्ष डॉलर्सच्या कराराच्या अंतर्गत अशाप्रकारच्या 100 तोफा स्वत:च्या ताफ्यात सामील केल्या आहेत आणि त्यातील अनेक तोफांना पर्वतीय क्षेत्रांमध्ये संचालन करण्यासाठी अपग्रेड करण्यात आल्यावर लडाख सेक्टरमध्ये तैनात केले आहे. तोफा मूळ स्वरुपात वाळवंटी भागासाठी खरेदी करण्यात आल्या होत्या.
एटीएजीएस कार्यक्रम
डीआरडीओने 2013 मध्ये एटीएजीएस प्रोजेक्टची सुरुवात केली होती, ज्याचा उद्देश सैन्याच्या जुन्या तोफांना आधुनिक 155 एमएम आर्टिलरी गन सिस्टीमने बदलणे होता. डीआरडीओने तोफांच्या निर्मितीसाठी भारत फोर्ज आणि टाटा अॅडव्हान्स्ड सिस्टीम लिमिटेडसोबत करार केला आहे. ही ऑर्डर दोन्ही कंपन्यांमध्ये विभागण्यात येणार आहे. भारत फोर्ज एटीएजीएस निविदेसाठी सर्वात कमी बोली लावणारी कंपनी ठरली असून ती 60 टक्के तोफांची निर्मिती अन् पुरवठा करणार आहे. तर उर्वरित 40 टक्के तोफांचे उत्पादन टाटा अॅडव्हान्स्ड सिस्टीम लिमिटेकडून करण्यात येईल.
सैन्याचे बळ वाढणार
कारगिल युद्धानंतर सैन्याचे आधुनिकीकरण करण्याच्या दिशेने पावले उचलण्यात आली. सैन्याची आर्टिलरी म्हणजेच तोफखान्याला अधिक मजबूत करण्यात आले आणि स्वदेशी तोफांना सैन्यात सामील करण्यात आले. भारतीय सैन्याकडे आता 155 एमएम अल्ट्रा लाइट हॉवित्जर एम-777 गन देखील आहे. ही गन हेलिकॉप्टरद्वारे उंच पर्वतीय क्षेत्रांमध्ये पोहोचविली जाऊ शकते.
अमेरिकेकडून 145 तोफा प्राप्त
भारताने अमेरिकेसोबत 145 तोफांसाठी करार केला होता आणि या सर्व तोफा भारतीय सैन्याला प्राप्त झाल्या आहेत. या तोफांना लडाख तसेच पूर्व सेक्टरमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तैनात करण्यात आले आहे. भारतीय सैन्य तोफखान्याची शक्ती वाढविण्यासाठी वेगाने पावले उचलत आहे. 2040 पर्यंत सर्व तोफा 155 एमएम कॅलिबरच्या असाव्यात असे लक्ष्य आहे. सध्या 105 आणि 130 एमएमच्या तोफा देखील आहेत. अधिक कॅलिबरचा अर्थ अधिक घातक. कुठल्याही युद्धात आघाडी मिळविण्यासाठी फायरपॉवर मोठा घटक असल्याचे रशिया-युक्रेन युद्धाने दाखवून दिले आहे.









