कराड :
शहरात बंडावलेली प्लास्टिकविरोधी मोहीम तीव्र करण्यावर नगरपालिका, एन्व्हायरो फ्रेण्डस् क्लब, शिवाजी उद्यान ग्रुप व विविध व्यापारी संघटनांच्या बैठकीत एकमताने निर्णय घेण्यात आला. सिंगल युझ प्लास्टिक व कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या वापरणारांवर बेट कारवाईचा निर्णय घेण्यात आला. रोज दुकानांमध्ये तपासणी करण्यात येणार असून नागरिकांकडे प्लास्टिक आढळल्यास त्यांच्यावरही कारवाई होणार आहे. बैठकीत व्यापाऱ्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दर्शवून प्लास्टिक वापरणार नसल्याचे सांगितले.
एन्व्हायरो नेचर फ्रेंडस क्लबचे अध्यक्ष जालिंदर काशिद, पालिकेचे स्वच्छता निरीक्षक देवानंद जगताप, मुकेश अहिवळे, वृक्षमित्र चंद्रकांत जाधव, ए. आर. पवार, रमेश पवार, चंद्रशेखर नकाते, प्रसाद पावसकर, विजय खबाले, डॉ. सुधीर कुंभार, एम. बी. शिंदे, माणिक बनकर, आत्माराम अर्जुगडे यांची उपस्थिती होती. दरम्यान, बुधवारी पहिल्याच दिवशी या मोहिमत सकाळी १० किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. दररोज ही मोहीम राबवण्यात येणार आहे.
बैठकीत जालिंदर काशिद म्हणाले, शासनाने महाराष्ट्र प्लास्टिक व चर्मोकोल उत्पादन, वापर, विक्री, वाहतूक, हाताळणी व साठवणूक अधिसूचना, २०१८ प्रकाशित केली आहे. त्यानुसार एकल वापराच्या म्हणजेच सिंगल युझ प्लास्टिक वस्तू उत्पादन, वापर, वाहतूक, वितरण, घाऊक आणि किरकोळ विक्री आणि साठवणूक यावर बंदी घातली आहे. तसेच केंद्र शासनाने सिंगल यूज प्लास्टिक अधिसूचना २०२१ ही १२ ऑगस्ट २०२१ रोजी प्रकाशित केली आहे. असे असले तरी २००८ मध्येच पालिकेच्या सहकार्याने एनव्हायरो क्लबने प्लास्टिक विरोधी मोडीम सुरू केली होती. त्यानंतर कराडमध्ये याबाबत जनजागृती होऊन प्लास्टिक विरोधी मोहिमेस यश आले, मात्र त्यानंतर ही मोहीम संथ झाल्याने प्लास्टिकचा वापर वाढला. त्यामुळे आता डी मोहीम तीव्र होणार आहे.
ए. आर. पवार म्हणाले, प्लास्टिकचा नायनाट करण्यासाठी व्यापाऱ्यांबरोबरच नागरिकांचीही जबाबदारी आहे. व्यापाऱ्यांनी किराणा पिशवीचा वापर करावा. मटण, चिकन विक्रेत्यांनी ग्राहकांना मटण नेण्यासाठी घरातून डबा आणण्याचा आग्रह करावा. फळे, भाज्यांसाठी साडीबॅगचा वापर करावा. तसेच प्लास्टिक पिशवी वापरल्याचे आढळल्यास नागरिकांवरही कारवाई करण्यात येणार आहे.
रमेश पवार म्हणाले, प्लास्टिक विरोधात कारवाई करताना छोटा व्यापारी, मोठा व्यापारी असा भेदभाव न करता सरसकट कारवाई करण्यात येणार आहे.
- मुख्याधिकारी यांनी हॉकर्स धारकांची मिटिंग घ्यावी
हॉकर्स संघटनेचे अनेक निर्णय प्रलंबित आहेत. गेल्या अनेक वर्षात हॉकर्स संघटनेची बैठक झालेली नाही. अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. मुख्याधिकारी बैठक बोलावत नाहीत. त्यांनी बैठक बोलावणे गरजेचे आहे, असे हॉकर्स संघटनेचे हरी बल्लाळ यांनी सांगितले. तसेच हॉकर्स संघटनेचे प्लास्टिक विरोधी मोहिमेस पूर्ण सहकार्य असून याबाबत व्यावसायिकांमध्ये जनजागृती करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
- मटण, मासे विक्रेते, व्यापाऱ्यांचा पाठिंबा
बैठकीमध्ये मटण विक्रेते, हॉटेल व्यावसायिक, पार्सल देणारे तसेच अन्य व्यापाऱ्यांनी प्लास्टिक विरोधी मोहिमेस सहकार्य करू तसेच प्लास्टिकचा वापर करणार नाही आणि ग्राहकांनाही करू देणार नसल्याचे सांगून या मोहिमेस आमचा पाठिंबा असल्याचे सांगितले.
- अशी होणार कारवाई
बुधवारपासून नगरपालिका व क्लबच्या माध्यमातून शहरात फिरून व्यापाऱ्यांकडून प्लास्टिक पिशव्या जप्त करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. प्लास्टिक जप्तीनंतर पुन्हा प्लास्टिकच्या पिशव्या आढळून आल्यास प्रथम ५ हजार रूपये दंड, त्यानंतरही आढळून आल्यास १० हजार रूपये दंड व त्यानंतर २५ हजार रूपये दंड आकारण्यात येणार आहे.








