चिपळूण :
चिपळूण शहराच्यादृष्टीने विचार केला तर आखण्यात आलेल्या लाल, निळ्या पूररेषांचा प्रश्न महत्वपूर्ण आहे. त्यामुळे या पूररेषांसंदर्भात लवकरच बैठक घेऊन मार्ग काढला जाईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी दिले आहे.
रत्नागिरीत विविध विकासकामांच्या उद्घाटनानिमित्त दौऱ्यावर आलेल्या उपमुख्यमंत्री पवार यांची आमदार शेखर निकम यांच्या माध्यमातून चिपळूण शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष मिलिंद कापडी, अर्बन बँकेचे माजी संचालक उमेश काटकर, क्रेडाई महाराष्ट्राचे सहचिटणीस राजेश वाजे, सचिन रेडीज यांनी भेट घेतली. यावेळी शहराच्या विकासाबरोबर प्रलंबित असलेल्या शहरातीत लाल व निळ्या पूररेषा हटवण्यासंदर्भात चर्चा केली. शहरात बंद असलेल्या बांधकाम परवानग्या सुरू करण्याबरोबरच शहरातील विविध विकासकामांना निधी मिळण्यासाठीची मागणी करण्यात आली. यावेळी पालकमंत्री उदय सामंत, खासदार सुनील तटकरे यांनीही चर्चेदरम्यान पूररेषांचा प्रश्न निकालात काढण्याची विनंती उपमुख्यमंत्री पवार यांना केली.








