चिपळूण :
शहरातील गोवळकोट येथील वािशष्ठी नदीत पोहण्यासाठी गेलेला 15 वर्षीय युवक बुडाल्याची खळबळजनक घटना बुधवारी सायंकाळी 4.30 च्या सुमारास घडली. या युवकाचे बोटीद्वारे शोधकार्य सुरु केल्यानंतर अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर त्याचा मृतदेह सापडला. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले.
तलहा मन्सूर घारे (15, गोवळकोट) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. शहरातील गोवळकोट येथील वाशिष्ठी नदीत तलहा याच्यासह अन्य तिघे पोहण्यासाठी गेले होते. यामध्ये त्याचा लहान भाऊही होता. यावेळी नदीला भरती असल्याने नदी तुडुंब भरुन वाहत होती. अशात पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज तलहा याला न आल्याने तो पाण्यात बुडाला. काही क्षणातच तलहा दिसेनासा झाल्यानंतर उर्वरित तिघांनी आरडाओरडा केला. यामुळे स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने तत्काळ नदीत बोट चालकाच्या मदतीने शोधकार्य सुऊ केले. अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर अखेर तलहा याचा मृतदेह नदीपात्रात सापडला. या घटनेची माहिती पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांना मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. तलहा याचा मृतदेह नदीबाहेर काढून विच्छेदनासाठी कामथे उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला.
- तलहा घारेने दिली होती 10 वीची परीक्षा
तलहा हा खतिजा इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षण घेत होता. त्याने मंगळवारी 10वीचा शेवटचा पेपर दिला. असे असताना वाशिष्ठी नदीत पोहण्यासाठी गेला असताना त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्याच्या पश्चात आई, वडील, लहान भाऊ असा परिवार आहे. या घटनेमुळे घारे कुटुंबिय शोकसागरात बुडाले आहेत.








