पर्वरी पोलिसांचे 24 तासांत यश : चोरलेले दागिने, रोकड केली जप्त
पणजी : मार्रा-पिळर्ण येथे बिस्वास दाम्पत्याला सुऱ्याचा धाक दाखवून लाखो ऊपयांचा दरोडा घातलेल्या टोळीला पर्वरी पोलिसांनी 24 तासांच्या आत गजाआड करण्याची कौतुकास्पद कामगिरी केली आहे. अटक करण्यात आलेल्या पाच दरोडेखोरांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे. पर्वरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी 17 मार्च रोजी पहाटेच्या वेळेस पप्पू बिस्वास आणि त्यांच्या पत्नीला चाकूचा धाक दाखवून सुमारे 15 लाख ऊपये किंमतीचे सोन्याचे दागिने आणि 9 लाख रुपये रोख रक्कम दरोडेखोरांनी लंपास केली होती.
याबाबतची तक्रार पप्पू बिस्वास यांनी पर्वरी पोलिसांत नोंद करताच पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवताना संशयित आरोपींचा शोध घेण्यासाठी वेगवेगळी पथके तयार करण्यात आली होती. तांत्रिक पुरावे आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपासादरम्यान अखेर पोलिसांना आरोपींची ओळख पटवण्यात यश आले. त्यानंतर पोलिसांनी दरोड्याचा कट रचल्याबद्दल 5 आरोपींना अटक केली. अटक केलेल्या संशयित आरोपींमध्ये जॉयस उर्फ प्रिया डिसोझा (वय 32 रा. मार्रा-पिळर्ण), श्रीमती कल्पना बर्की (वय 37, रा. चंदनवाडी, बस्तोडा), इम्रान शेख (वय 43, रा. झेल बस्तोडा, मूळ. संतोषनगर, कात्रज-पुणे), सुभाष कुमार (वय 27, रा. कोलवाळ) आणि धीरज गुप्ता (वय 20, रा. गणेशनगर, कोलवाळ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात आरोपी प्रिया उर्फ जॉयसी डिसोझा ही तक्रारदाराची शेजारीण होती आणि तक्रारदाराच्या कुटुंबाशी मैत्रीपूर्ण संबंध असल्याने तिला तिच्याकडे असलेल्या मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आणि सोने याची माहिती होते. जॉयसीने तिचा मित्र कृष्णा बेळगावकर आणि कल्पना बर्की यांच्यासह गुन्हा करण्याचा कट रचला. आरोपी कृष्णाने उर्वरित आरोपींची व्यवस्था केली. कल्पना बर्की यांनी तिचा मित्र इम्रान याच्यासह गुन्हा करण्यासाठी वाहनाची व्यवस्था केली. गुह्यानंतर कळंगुट येथील एका हॉटेलमध्ये आरोपींमध्ये चोरीचे सोने आणि रोख रक्कम वाटण्यात आली.
संशयित आरोपी जॉयसी डिसोझा हिच्यावर यापूर्वी पर्वरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद आहे. कृष्णा बेळगावकर 2018 मध्ये कळंगुट पोलिसस्थानकात खून प्रकरणात सहभागी असल्याचा गुन्हा नोंद आहे. सध्या तो जामिनावर मुक्त होता. कल्पना बर्की हिच्याविऊद्ध यापूर्वी 2018 मध्ये कुडचडे पोलिसस्थानकात कलम 302, 201, कलम 120-ब अंतर्गत तिच्या पतीच्या हत्येच्या प्रकरणात सहभागी असल्याबद्दल गुन्हा नोंद आहे. पोलिसांनी चोरीला गेलेला मुद्देमाल, धमकी देण्यासाठी वापरलेला चाकू, दरवाजा तोडण्यासाठी वापरलेला लोखंडी रॉड आणि गुन्हा करण्यासाठी वापरलेले वाहन जप्त करण्यात यश मिळवले आहे.
पर्वरीचे पोलीस उपअधीक्षक विश्वेश कर्पे यांच्या देखरेखीखाली तपास पथकात पोलीस निरीक्षक मंदार परब, पोलिस उपनिरीक्षक सीताराम मलिक, उपनिरीक्षक प्रजोती देसाई, उपनिरीक्षक प्रतीक तुळसकर, उपनिरीक्षक आकाश चोडणकर, उपनिरीक्षक अरुण शिरोडकर, उपनिरीक्षक सचिन शिरोडकर, हेड कॉन्स्टेबल विनय श्रीवास्तव, कॉन्स्टेबल महादेव नाईक, नितेश गौडे, आकाश नाईक, आकाश नावेलकर, हेमंत गावकर आणि इतरांचा समावेश होता.









