वृत्तसंस्था / वेलिंग्टन
यजमान न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघामध्ये 21 मार्चपासून सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी न्यूझीलंड महिला संघाची घोषणा करण्यात आली. या संघामध्ये सोफी डिव्हाईन, मेली केर आणि तेहुहू यांचे पुनरागमन झाले आहे.
या मालिकेसाठी सुझी बेट्सकडे संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. सोफी डिव्हाईन्सचे बऱ्याच कालावधीच्या विश्रांतीनंतर संघात पुनरागमन होत आहे. या मालिकेतील सामने ऑकलंड आणि वेलिंग्टनमध्ये खेळविले जातील. पहिला सामना 21 मार्चला इडनपार्क मैदानावर ऑकलंड येथे होईल. दुसरा सामना 23 मार्चला बे ओव्हल टॉरेंगा येथे तर तिसरा आणि शेवटचा सामना वेलिंग्टनच्या स्काय स्टेडियमध्ये 26 मार्चला खेळविला जाणार आहे. अलिकडे न्यूझीलंड महिला संघाने लंकेविरुद्ध टी-20 वनडे मालिका खेळल्या होत्या. न्यूझीलंडने लंकेविरुद्धची तीन सामन्यांची वनडे मालिका 2-0 अशा फरकाने जिंकली होती तर तीन सामन्यांची टी-20 मालिका 1-1 अशी बरोबरीत राहिली.
न्यूझीलंड महिला संघ: सुझी बेट्स (कर्णधार), कार्सन, सोफी डिव्हाईन, मॅडी ग्रीन, हॅलिडे, इंग्लीस, बेला जेम्स, फ्रेन जेम्स, जोनास, जेस केर, मेली केर, रोजमेरी मेअर, प्लिमेर आणि तेहुहू









