प्रत्येकाच्या उत्पन्न, मालमत्तेची माहिती गोळा करणार
पणजी : गोवा राज्यासह देशभरात आठवी आर्थिक जनगणना करण्यात येणार असून त्यासाठी गोव्याच्या मुख्य सचिवांच्या नेतृत्वाखाली गोवा राज्यस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. या जनगणनेत प्रत्येक घरातील प्रत्येक व्यक्तीच्या मालमत्तेची, उत्पन्नाची माहिती गोळा केली जाणार असून त्याआधारे अहवाल तयार करण्यात येणार आहे. केंद्रीय नियोजन व सांख्यिकी मंत्रालयाने 2025-26 या वर्षात सदर जनगणना करण्याचा आदेश सर्व राज्यांना जारी केला आहे.
राज्यस्तरीय समितीत राज्याचे नियोजन व सांख्यिकी आयुक्त, पंचायत सचिव, नगरपालिका आयुक्त, उद्योग सचिव, कामगार सचिव आणि इतरांचा समावेश करण्यात आला आहे. उत्तर गोवा जिह्यातील जनगणनेचे प्रमुख उत्तर गोवा जिल्हाधिकारी तर दक्षिण गोवा जिह्यातील जनगणनेचे प्रमुख दक्षिण गोवा जिल्हाधिकारी असणार आहेत. सदर जनगणनेची अधिसूचनाही काढण्यात आल्याचे सरकारी सूत्रांनी सांगितले.
या जनगणनेसाठी जेवढे कर्मचारी लागतील ते नियुक्त करण्याची जबाबदारी दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे. त्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार असून प्रती महिना 5 तारखेला अहवाल सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे. खर्चाची बिले तपासून मंजूर करण्याचे कामही जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. शिवाय जिल्हा पातळीवरही समिती स्थापन करण्यात आली आहे.









