बेळगाव : सावगाव येथे नैतिक पोलिसगिरी केल्याच्या आरोपावरून बेळगाव ग्रामीण पोलिसांनी रविवारी चार तरुणांना अटक करून त्यांची रवानगी हिंडलगा कारागृहात केली. या प्रकरणातील आणखी दोघे संशयित फरारी असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी जोरदार प्रयत्न चालविले आहेत. या प्रकरणी पोलिसांवर दबाव वाढला असल्याने हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे.
अल्लाउद्दीन इस्लामाईल पिरजादे (वय 19) रा. निंगापूर गल्ली, खानापूर हा तरुण रविवारी नानावाडी रोडवरील सावगाव गावच्या हद्दीतील माळरानावर आपल्या मैत्रिणीसोबत फिरावयास आला होता. त्यावेळी त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या तरुणांनी अल्लाउद्दीनला बेदम मारहाण करण्यासह प्रेयसीवरदेखील दमदाटी केली. या प्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला.
ऐन रमजान सणाच्या तोंडावर एका विशिष्ट समाजातील तरुणाला मारहाण केल्याने या प्रकरणाला वेगळे वळण मिळू नये, यासाठी पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले. रविवारी मध्यरात्री संतोष जाधव व विदेश पाटील दोघे रा. सावगाव तर जय इंचल, आणि सुमीत मोरे दोघे राहणार भाग्यनगर, अनगोळ या चौघांना अटक केली. या प्रकरणातील आणखी दोघे तरुण फरार आहेत. त्यामुळे त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी जाळे विणले आहे.









