21 मार्चपासून परीक्षेला प्रारंभ : 14 बैठी पथके, 240 निरीक्षकांच्या निगराणीत परीक्षा
खानापूर : कर्नाटक राज्यातील दहावीच्या परीक्षेला शुक्रवार दि. 21 पासून सुऊवात होणार आहे. यासाठी खानापूर तालुक्यात 11 परीक्षा केंद्रांत एकूण 3883 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. परीक्षेच्या दृष्टीने सर्व केंद्रे आता परीक्षार्थींसाठी सज्ज झाली आहेत. खानापूर तालुका शिक्षण विभागाने परीक्षेची तयारी पूर्ण केली आहे. याबाबतची माहिती तालुका शिक्षणाधिकारी पी. रामाप्पा यांनी आपल्या कार्यालयात बोलावलेल्या पत्रकार परिषदेत दिली. यावेळी परीक्षा निरीक्षक भारती लोकापुरे, बीआरसी अशोक अंबगी, सीआरसी शंकर कम्मार, व्यवस्थापक होसमणी यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
खानापूर शहरात मराठा मंडळ, ताराराणी, सर्वोदय विद्यालय अशी तीन परीक्षा केंद्रे असून ग्रामीण भागासाठी शांतीनिकेतन पब्लिक स्कूल, इटगी, पारिश्वाड, नंदगड, होलिक्रॉस बिडी, लोंढा, मुगलीहाळ व जांबोटी येथील हायस्कूलमध्ये परीक्षा केंद्रे असणार आहेत. एकूण 11 केंद्रांत 174 वर्गखोल्यांमध्ये परीक्षा घेण्यात येणार आहे. यात 3643 नियमित विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. यामध्ये 1772 परीक्षार्थी तर 1871 विद्यार्थिनी आहेत. तर रिपीटर 33 परीक्षार्थी असून बहिस्थ 204 परीक्षार्थी आहेत. असे एकूण 3883 परीक्षार्थी परीक्षा देणार आहेत. या परीक्षेसाठी पर्यवेक्षक म्हणून 240 शिक्षक तैनात करण्यात आले आहेत.
तर 174 वर्गखोल्यांत ही परीक्षा घेण्यात येणार आहे. या सर्व वर्गखोल्यांत सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्यात आले असून या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून खानापूर, बेळगाव आणि बेंगळूर येथील शिक्षणाधिकारी परीक्षेवर नजर ठेवणार आहेत. त्यामुळे पूर्णपणे कॉपीला आळा बसण्यासाठी प्रयत्न आहे. तसेच परीक्षा केंद्रांवर कॉपी रोखण्यासाठी 9 भरारी पथके तर प्रत्येक केंद्रावर एक याप्रमाणे 14 बैठे पथक राहणार आहेत. तालुक्यात परीक्षा केंद्रांसाठी सात मार्ग तयार केले आहेत. परीक्षेच्या प्रत्येक दिवशी पोलीस बंदोबस्तात या मार्गावरुन परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका पोचविण्यात येणार आहे.
निकाल वाढविण्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
शुक्रवार दि. 21 रोजी सकाळी 10 वाजता प्रथम भाषा मराठी पेपर होणार आहे. तर सोमवार दि. 24 रोजी गणित, सकाळी 10 वाजता तर बुधवार दि. 26 रोजी इंग्रजी (द्वितीय भाषा), शनिवार दि. 29 रोजी समाज विज्ञान, तर बुधवार दि. 2 एप्रिल रोजी विज्ञान, शुक्रवार दि. 4 रोजी तृतीय भाषा कन्नड, हिंदी याप्रमाणे परीक्षा वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. दहावीच्या निकालाचा स्तर वाढवण्यासाठी गेल्या काही महिन्यापासून प्रयत्न सुरू असून विद्यार्थ्यांना विविध प्रकारे मार्गदर्शन करण्यात आले असून यावर्षी 85 टक्के निकाल लागण्यासाठी शिक्षण खात्याकडून प्रयत्न सुरू आहेत.
परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी परीक्षा केंद्रांच्या ठिकाणी 144 कलम लावण्यात आले आहे. तसेच वैद्यकीय सुविधांसह सर्व खबरदारी घेण्यात आली आहे. यासाठी परीक्षा केंद्रांच्या परिसरात कोणीही गर्दी करू नये, प्रत्येक परीक्षा केंद्रावर आरोग्य विषयक अडचणी आल्यास त्याचे निवारण करण्यासाठी एक नर्स व अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्त्यांची टीमही कार्यरत राहणार आहे. परीक्षार्थीला कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी सर्वप्रकारची काळजी घेणार आहे, अशी माहिती गटशिक्षणाधिकारी पी. रामाप्पा यांनी दिली.









