बेळगाव : शाळेला जाण्यासाठी चिमुकल्याने आईचे बोट सोडून घराबाहेर पाऊल टाकले की रिक्षामामा त्याचे बोट पकडतात आणि सुरक्षितपणे त्याला शाळेत सोडतात. निरागस, निष्पाप अशा लहान मुलांच्या विश्व़ामध्ये म्हणूनच आई-बाबांइतके रिक्षामामा लाडके असतात. वर्षानुवर्षे या मुलांसाठी शाळेची वर्दी करताना रिक्षामामांचीसुद्धा या मुलांशी आपुलकीचे बंध जुळतात. या अतूट स्नेहबंधाला गहिरे रंग चढवत दरवर्षी रिक्षामामा त्या मुलांशी धमालमस्ती करतात, ते पुन्हा पुढच्या वर्षी भेटण्याचे ठरवतात.
बेळगाव शहरातील काही इंग्रजी माध्यमाच्या शाळांचा बुधवारी शेवटचा दिवस असणार आहे. परंतु याच दिवशी वडगाव, शहापूर येथील रंगपंचमी असल्याने एक दिवस आधीच शैक्षणिक वर्षाचा शेवटचा दिवस विद्यार्थ्यांनी आनंदात घालविला. वर्षभर रिक्षातून ने-आण करणाऱ्या रिक्षामामांनी वनभोजनाचे आयोजन केले होते. यामुळे शिवाजी उद्यान, टिळकवाडी येथील सायन्स पार्क यासह शहरातील इतर ठिकाणी विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. विद्यार्थ्यांसोबत खेळ खेळून रिक्षामामांनी त्यांना खाद्यपदार्थ खाऊ घातले. वडापाव, पाणीपुरी, पॅटीस, समोसा, कचोरी, कोल्ड्रिंक्स, आइस्क्रीम देऊ केले. बऱ्याच विद्यार्थ्यांनी रंगांची उधळण करत शाळेचा शेवटचा दिवस आनंदात घालविला.
विद्यार्थ्यांसोबतचे भावनिक नाते
वर्षभर विद्यार्थ्यांना घरातून शाळेपर्यंत आणणे व पुन्हा शाळेतून घरापर्यंत सुरक्षित पोहोचविणे, यामुळे त्यांच्यासोबत भावनिक नाते तयार होते. शाळेच्या शेवटच्या दिवशी विद्यार्थ्यांना मौजमजा करता यावी यासाठी छोट्याशा वनभोजनाचे आयोजन केले जाते. यातून विद्यार्थ्यांनाही आनंद मिळत असतो.
-विनोद जेऊर, रिक्षाचालक
विद्यार्थ्यांचा एक दिवस आनंदात
रिक्षाचालक आणि विद्यार्थ्यांचे वेगळेच नाते असते. आई-वडील मोठ्या विश्वासाने विद्यार्थ्यांना ने-आण करण्याची जबाबदारी रिक्षामामांकडे देतात. ही जबाबदारी आम्ही मागील 25 वर्षांपासून पूर्ण करत आहोत. पुढील दीड ते दोन महिने वर्दी नसल्याने आमच्या कुटुंबांचे हाल होणार हे माहिती असतानाही विद्यार्थ्यांचा एक दिवस आनंदात जावा यासाठी त्यांना गोडधोड खाऊ घातला जातो.
-सचिन पाटील, रिक्षाचालक











