कुत्री, जनावरे, डुक्कर पकडताना होतेय कसरत : मोकाट कुत्री नागरिकांचा चावा घेत असल्याने भीतीचे वातावरण
बेळगाव : शहरात हजारो मोकाट कुत्री, भटकी जनावरे, डुकरे असली तरी यावर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेच्या पशुसंगोपन विभागाचा केवळ एकच पशुनिरीक्षक कार्यरत आहे. त्यांच्या हाताखाली एक सफाई कामगार देण्यात आला असून या दोघांकडूनच शहरातील मोकाट कुत्री, भटकी जनावरे व डुकरांचा बंदोबस्त करण्यासाठी धडपड केली जात आहे. या विभागातील मनुष्यबळ वाढविण्याऐवजी महापालिकेचे पर्यावरण अभियंते हनुमंत कलादगी यांनी उलट पशुसंगोपन वरिष्ठ निरीक्षक राजू संकण्णावर यांना निलंबित करण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
शहरातील 58 प्रभागांमध्ये मोकाट कुत्री, भटकी जनावरे आणि डुकरांची समस्या गंभीर बनली आहे. विशेष करून मोकाट कुत्री नागरिकांचा चावा घेत असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच भटकी जनावरे शहरातील मुख्य रस्त्यावरच ठाण मांडून बसत असल्याने याचा वाहतूक व्यवस्थेवर परिणाम होत आहे. खासगी मालकांनी पाळलेल्या डुकरांचा उपद्रवही उपनगरात मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे या जनावरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी जनतेतून केली जात आहे. मात्र 58 प्रभागांसाठी केवळ एकच पशुसंगोपन वरिष्ठ निरीक्षक सेवा बजावत आहे. एखाद्या ठिकाणचे जनावर पकडायचे असल्यास त्यांना इतरांची मदत घ्यावी लागत आहे. एक सफाई कामगार त्यांच्या हाताखाली देण्यात आला असून तो कधी असतो किंवा नसतो त्यामुळे वरिष्ठ पशुनिरीक्षकाला कसरत करावी लागत आहे.
सोमवारी गणेशपूर येथे प्राविण्या शुभम भोयर या सहा वर्षीय बालिकेचा कुत्र्याने चावा घेतल्याने तिच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत प्रसारमाध्यमातून बातमी प्रसिद्ध होताच महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. संजीव नांद्रे खडबडून जागे झाले आहेत. सोमवारी गणेशपूर येथे घडलेली घटना बेनकनहळ्ळी ग्रा. पं. च्या हद्दीत येते. मात्र आरोग्य अधिकाऱ्यांनी याची शहानिशा करण्यापूर्वीच वरिष्ठ पशुनिरीक्षक राजू संकण्णावर यांना गणेशपूर येथे जाऊन मोकाट कुत्री पकडण्याची सूचना केली. त्यानुसार संकण्णावर आपल्या सहकाऱ्यांसह महापालिकेचे वाहन घेऊन गणेशपूरला दाखल झाले. पण गणेशपूर महापालिकेच्या हद्दीत येत नसल्याचे लक्षात आल्यानंतर पथक माघारी फिरले. पाईपलाईन रोड परिसर महापालिकेच्या हद्दीत येतो. त्यामुळे तेथील चार मोकाट कुत्री पकडण्यात आली. पकडलेली कुत्री श्रीनगर येथील ए, बी केंद्रात सोडण्यात आली. संपूर्ण शहराची जबाबदारी केवळ एका पशुनिरीक्षकावर असल्याने त्यांच्यावर कामाचा ताण वाढला आहे. या विभागात मनुष्यबळ वाढवून देण्याऐवजी पर्यावरण अभियंता हनुमंत कलादगी यांनी राजू संकण्णावर यांना निलंबित करण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे महापालिकेत या प्रकाराची जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान गणेशपूर येथे कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या बालिकेची राजू संकण्णावर व महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी जिल्हा रुग्णालयाला भेट देऊन चौकशी केली.
महात्मा फुले रोडवर पकडला पिसाळलेला कुत्रा
महात्मा फुले रोडवर पिसाळलेल्या कुत्र्याचा वावर सुरू असल्याची माहिती महापालिकेतील सत्ताधारी गटाचे नेते गिरीश धोंगडी यांनी वरिष्ठ पशुनिरीक्षक राजू संकण्णावर यांना दिली. त्यामुळे काही वेळातच संकण्णावर महात्मा फुले रोडवर दाखल झाले. त्यांनी याठिकाणचा कुत्रा पकडून त्याला श्रीनगर येथील ए-बी केंद्रात हलविले. सदर कुत्र्याला निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.
सिद्धार्थ लेआऊटमध्ये पकडली 18 डुकरे
महापालिकेच्या हद्दीतील बॉक्साईट रोड येथील सिद्धार्थ लेआऊट परिसरात डुकरांचा उपद्रव वाढला आहे. त्यामुळे त्यांचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी रहिवाशांमधून केली जात आहे. ही माहिती समजताच सदर डुक्कर पकडण्यासाठी राजू संकण्णावर गेले होते. मात्र सदर डुकरे रुक्मिणीनगर येथील लक्ष्मण नामक व्यक्तीची असल्याचे समजल्यानंतर मालकाशी संपर्क साधण्यात आला. मालकाने सिद्धार्थ लेआऊट परिसरातील आपली 18 डुकरे पकडली असून उर्वरित 25 डुकरे पकडण्याची सूचनादेखील त्यांना करण्यात आली आहे.









