जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांचे प्रतिपादन
सावंतवाडी । प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्यात साहित्य व वाचन चळवळ अधिक व्यापक करण्याच्या दृष्टीने पालकमंत्री नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व ग्रंथालये ई – ग्रंथालये करण्याचा संकल्प केला आहे. त्या दृष्टीने सर्वप्रथम सिंधुदुर्गनगरीत जिल्हा ग्रंथालय साहित्य केंद्र उभे केले जाणार आहे .त्यानंतर प्रत्येक तालुक्यातील ग्रंथालय संगणीकृत करून पाच वर्षात सिंधुदुर्ग जिल्ह्यात ई लर्निंग ग्रंथालये निर्माण केली जाणार आहेत. सावंतवाडीत जिल्हास्तरीय दर्जेदार असे साहित्य संमेलन होत आहे. ही एक स्तुत्य बाब आहे . असे जिल्हा बँकेचे चेअरमन मनीष दळवी यांनी स्पष्ट केले. यावेळी कोमसापच्या सदस्यांनी श्री दळवी यांची भेट घेत २२ मार्च रोजी सावंतवाडी येथे होणाऱ्या साहित्य संमेलनाचे निमंत्रण दिले . या साहित्य संमेलनला आपल्याकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. साहित्य चळवळ ही सामाजिक आणि सांस्कृतिक चळवळीशी निगडित आहे त्यामुळे हे संमेलन निश्चितच दर्जेदार होईल असे श्री दळवी यांनी स्पष्ट केले. यावेळी जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष तथा कोकण मराठी साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष मंगेश मस्के , कोकण मराठी साहित्य परिषदेचे तालुकाध्यक्ष तथा जिल्हा ग्रंथालय संघाचे संचालक एडवोकेट संतोष सावंत, कोकण मराठी साहित्य परिषदचे जिल्हा खजिनदार तथा जिल्हा ग्रंथालय संचालक भरत गावडे, कोकण मराठी साहित्य परिषदेचे तालुका उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे , जिल्हा ग्रंथालय अधिकारी सचिन हजारे आधी उपस्थित होते .









