वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांनी क्रिकेट दौऱ्यांदरम्यान कौटुंबिक सहभागाविषयी चालू असलेल्या वादावर भाष्य केले असून संघाकडील बांधिलकी आणि वैयक्तिक जीवन यांच्याता संतुलन आवश्यक असल्याचे म्हटले आहे. विराट कोहलीच्या अलीकडच्या टिप्पण्यांना उत्तर देताना त्यांनी म्हटले आहे की, कोणत्याही खेळाडूला एकटे बसणे आणि उदासीन राहणे आवडणार नाही. सांघिक एकता टिकवून ठेवताना कौटुंबिक समर्थनाच्या महत्त्वावरही त्यांनी जोर दिला आहे.
तो शेवटी क्रिकेट मंडळाने घ्यायचा निर्णय आहे. परंतु माझे मत असे आहे की, तुम्हाला तुमच्या कुटुंबाची गरज असते आणि नेहमी संघाने तुमच्यासोबत राहणेही गरजेचे असते, असे कपिल देवनी म्हटले आहे. 1983 च्या विश्वचषक विजेत्या कर्णधाराने आपल्या वेळच्या परिस्थितीवर भाष्य करताना त्यावेळी खेळाडू कसे संतुलन साधायचे ते उघड केले. ‘आमच्या काळात, क्रिकेट मंडळ सांगत नसे, तर आम्ही स्वत:ला सांगायचो की, पहिल्या सहामाहीत आपण क्रिकेटवर लक्ष केंद्रीत करूया आणि दुसऱ्या सहामाहीत कुटुंबांनीही त्यात सामील व्हावे आणि आनंद घ्यावा. हे एक मिश्रण असले पाहिजे’, असे ते म्हणाले.









