वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
स्पेशल ऑलिम्पिक जागतिक हिवाळी खेळांतील ऐतिहासिक मोहिमेनंतर इटलीच्या टुरिन येथून परतलेल्या भारतीय खेळाडूंसाठी स्पेशल ऑलिम्पिक भारतकडून सोमवारी स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला. दरम्यान, आपल्याला भेटलेल्या खेळाडूंसोबतची छायाचित्रे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोस्ट केली असून त्यांच्या कामगिरीबद्दल प्रचंड आनंद आणि अभिमान व्यक्त केला आहे.
30 अॅथलीट आणि 19 सपोर्ट स्टाफ सदस्यांचा समावेश असलेली भारतीय तुकडी 8 सुवर्ण, 18 रौप्य आणि 7 कांस्यपदके अशा 33 पदकांच्या प्रेरणादायी कमाईसह मायदेशी परतली. त्यांनी सहा क्रीडा शाखांमध्ये ही पदके जिंकली. त्यात अल्पाइन स्कीइंग, स्नोबोर्डिंग, फ्लोअरबॉल, स्नोशुइंग, क्रॉस स्पीड कंट्री स्कीइंग आणि शॉर्ट स्कीइंग यांचा समावेश राहिला.
इटलीच्या टुरिन येथे झालेल्या स्पेशल ऑलिम्पिक जागतिक हिंवाळी खेळांत देशाला गौरव मिळवून देणाऱ्या आमच्या खेळाडूंचा मला खूप अभिमान वाटतो. आमच्या अतुलनीय तुकडीने 33 पदके घरी आणली आहेत. संसद भवनात या तुकडीची भेट घेतली आणि त्यांच्या कामगिरीबद्दल त्यांचे अभिनंदन केल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक्स’वर पोस्ट केले आहे.
दरम्यान, मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियमवर झालेल्या सोहळ्यात युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या राज्यमंत्री रक्षा खडसे आणि स्पेशल ऑलिम्पिक भारतच्या अध्यक्षा मल्लिका न•ा उपस्थित होत्या. या स्पर्धेत दोन सुवर्णपदके जिंकणारी स्पेशल ऑलिम्पिक भारताची अॅथलीट भारती ही मान्यवरांसह मंचावर होती.
या खेळाडूंच्या कामगिरीची दखल घेत क्रीडा व युवा व्यवहार मंत्रालयाने पदक विजेत्यांसाठीची रोख बक्षिसे वाढवण्याची घोषणा केली आहे. स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्यांना रोख ऊ. 20 लाख आणि रौप्य व कांस्यपदक विजेत्यांना अनुक्रमे 14 लाख आणि 8 लाख ऊपयांचे पारितोषिक दिले जाते.









