वृत्तसंस्था / नेपीयर
यजमान न्यूझीलंड आणि लंका महिला क्रिकेट संघातील तीन सामन्यांची टी-20 मालिका 1-1 अशी बरोबरीत राहिली. न्यूझीलंडच्या दौऱ्यावर गेलेल्या लंकन महिला संघाला मात्र वनडे मालिका गमवावी लागली होती.
टी-20 मालिकेतील पहिले दोन सामने निकाली झाले. लंकेने आणि न्यूझीलंडने प्रत्येकी एक सामना जिंकून बरोबरी साधली होती. त्यामुळे मंगळवारच्या तिसऱ्या आणि निर्णायक सामन्याला विशेष महत्त्व निर्माण झाले होते. दरम्यान मुसळधार पावसामुळे हा सामना अर्धवट स्थितीत रद्द करण्यात आल्याने ही मालिका अखेर बरोबरीत सुटली. या शेवटच्या सामन्यात लंकेने नाणेफेक जिंकून न्यूझीलंडला प्रथम फलंदाजी दिली. न्यूझीलंडने 14.1 षटकात 3 बाद 101 धावा जमविल्या. कर्णधार सुझी बेट्स आणि प्लिमेर यांनी सलामीच्या गड्यासाठी 8.2 षटकात 60 धावांची भागिदारी केली. अट्टापटूने बेट्सला झेलबाद केले. तिने 28 चेंडूत 3 चौकारांसह 31 धावा जमविल्या. दिलहारीने मॅक्लोडला 4 धावांवर त्रिफळा चीत केले. लंकेच्या फर्नांडोने हॅलिडेला खाते उघडण्यापूर्वीच पायचीत केले. प्लिमेरने 37 चेंडूत 2 षटकार आणि 3 चौकारांसह नाबाद 46 तर शार्पने 14 चेंडूत 1 चौकारासह नाबाद 17 धावा जमविल्या. 14.1 षटकाचा खेळ झाला असताना पावसाला प्रारंभ झाल्याने पंचांनी हा सामना रद्द केला. या मालिकेत लंकेची कर्णधार चमारी अट्टापटूला मालिकावीर म्हणून घोषित करण्यात आले.









