31 मार्चपर्यंत स्वतंत्र आरोग्य विमा कंपनीमधील हिस्सेदारीची घोषणा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सरकारी मालकीची भारतीय जीवन विमा महामंडळ (एलआयसी) लवकरच आरोग्य विमा कंपनीतील हिस्सेदारी खरेदी करणार आहे. या संदर्भात मंगळवारी, एलआयसीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धार्थ मोहंती यांनी सांगितले की, विमा कंपनी चालू आर्थिक वर्ष 2025 च्या अखेरीस म्हणजेच 31 मार्चपर्यंत स्वतंत्र आरोग्य विमा कंपनीतील हिस्सेदारी खरेदी करण्याची घोषणा करू शकते.
दरम्यान सिद्धार्थ मोहंती यांनी एलआयसी ज्या कंपनीत महत्त्वपूर्ण हिस्सेदारी खरेदी करू इच्छित आहे त्याचे नाव उघड केलेले नाही. मुंबईत झालेल्या ग्लोबल कॉन्फरन्स ऑफ अॅक्च्युअरीजच्या बाजूला मोहंती म्हणाले, ‘आमच्या योजना आहेत आणि कंपनीशी चर्चा अंतिम टप्प्यात आहे. एलआयसीसाठी, आरोग्य विम्यात प्रवेश करणे हा एक नैसर्गिक पर्याय आहे. नियामक मंजुरींना वेळ लागतो, म्हणून मला आशा आहे की या आर्थिक वर्षात 31 मार्चपूर्वी निर्णय घेतला जाईल.’
एलआयसी बहुसंख्य हिस्सेदारी खरेदी करणार नाही
मोहंती यांनी असेही स्पष्ट केले की एलआयसी आरोग्य विमा कंपनीतील बहुसंख्य हिस्सेदारी खरेदी करणार नाही. एलआयसीने आर्थिक वर्ष 2025 च्या पहिल्या तिमाहीत म्हटले होते की, आरोग्य विमा व्यवसायात प्रवेश करण्यासाठी ते आर्थिक वर्ष 2025 मध्ये एका स्वतंत्र आरोग्य विमा कंपनीमध्ये हिस्सा खरेदी करू इच्छितात.
सध्या बाजारात सात स्वतंत्र आरोग्य विमा कंपन्या आहेत, ज्यात स्टार हेल्थ अँड अलाइड इन्शुरन्स, निवा बुपा हेल्थ इन्शुरन्स, केअर हेल्थ इन्शुरन्स, आदित्य बिर्ला हेल्थ इन्शुरन्स, मणिपाल सिग्ना हेल्थ इन्शुरन्स, नारायण हेल्थ इन्शुरन्स आणि गॅलेक्सी हेल्थ इन्शुरन्स यांचा समावेश आहे.
आरबीआयकडून दीर्घकालीन बाँडची एलआयसीची मागणी
याव्यतिरिक्त, मोहंती म्हणाले की, एलआयसीने आरबीआयला अतिरिक्त दीर्घकालीन बाँड जारी करण्याची विनंती केली आहे. एलआयसीने यापूर्वी 40 वर्षांच्या बाँडसाठी विनंती केली होती, जी आरबीआयने मंजूर केली होती. आता, एलआयसी 50 वर्षे आणि 100 वर्षांच्या बाँडसाठी आरबीआयशी चर्चा करत आहे.









