सातारा :
सातारा शहरात गुरुवार परज या सातारा पालिकेच्या मोकळ्या मैदानावर पालिकेच्यावतीने शॉपिंग कॉम्पलेक्स उभे राहत आहे. त्यास शहर सुधार समितीकडून विरोध सुरु झालेला आहे. त्यांनी शाळेचे मैदानाचा मुद्दा करत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आंदोलन केले आहे. दरम्यान, शहराच्या विकासाचा मुद्दा असला की त्या मुद्याला विरोधासाठी विरोध केवळ शहर सुधार समितीचे मोजकेच चार कार्यकर्ते करतात. आजही तसाच प्रकार निदर्शनास आला असून त्यांच्या या विरोधामागचे गमक मात्र समजू शकले नाही. मात्र, गुरुवार परज भागातील स्थानिक नेत्यांची चुप्पी का आहे. त्यांचाच या विकास कामाला विरोध आहे काय अशीही चर्चा सध्या सुरु आहे.
सातारा नगरपालिकेची गुरुवार परज येथे जागा आहे. शिक्षण मंडळाच्या अंतर्गत चालवण्यात येणारी शाळा नजिक आहे. त्या शाळेचीही इमारत जीर्ण झालेली आहे. त्याच इमारतीला लागून गुरुवार परजच्या मोकळ्या मैदानात अतिक्रमणे झालेली होती. हे सर्व मैदान पालिकेचेच असून त्याच मैदानात शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारण्याकरता सातारा पालिकेने तेथील सर्व अतिक्रमण नुकतीच काढली गेली. त्यानंतर त्याच अतिक्रमण धारकांशी शहर सुधार समितीच्या नेत्यांनी बैठका घडवून आणून नियोजित शॉपिंग कॉम्लेक्सला विरोध म्हणून सोमवारी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन केले. वास्तविक त्या मोकळ्या मैदानावर नादुरुस्त वाहने, बंद अवस्थेत असलेल्या टपऱ्या यांचीच अतिक्रमणे झाली होती. मोकळे शाळेचे मैदान असे कुठे दिसत नव्हते. सातारा पालिकेकडून होत असलेले शॉपिंग कॉम्पलेक्स हे सुमारे साडे पाच कोटी रुपयांच्या निधीतून साकारण्यात येणार असून त्यामध्ये भाजी विक्रेत्यांसाठी दुकानगाळे, पार्किंग असे नियोजन केलेले आहे. या होत असलेल्या शॉपिंग कॉम्पलेक्सला शहर सुधार समितीकडून विरोध होत असल्याने त्यावर तेथील स्थानिक नेते माजी नगरसेवक अल्लाउद्दीन शेख, माजी उपनगराध्यक्षा स्मिता घोडके, माजी उपनगराध्यक्ष जयवंत भोसले यांची चुप्पी का?, अतिक्रमण धारक हे मतदार असल्याने त्यांच्यासाठी त्यांची चुप्पी आहे काय?, असाही सवाल उपस्थित होत आहे.
- अनेक बाबतीत शहर सुधार समितीचा खोडा
सातारा शहराची हद्दवाढ झाली, त्याला विरोध, शहरात कॉम्लेक्स उभे रहात असले त्याला विरोध, अशा अनेक विकास कामांच्या बाबतीत शहर सुधार समितीकडून केवळ विरोध करण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे त्यांच्या लेखी तक्रारींचा सतत भडीमार होत असतो. त्यात आता पालिकेने गुरुवार परजावरील अतिक्रमण धारकांना हटवले. त्या अतिक्रमणधारकांना सोबत घेवून पालिकेच्या विरोधात रान पेटवण्याचा प्रयत्न सुरु आहे.








