चिपळूण :
जंगलातून आलेल्या वणव्यामुळे भंगार गोदाम खाक झाल्याची घटना सोमवारी दुपारी 2 वाजता मिरजोळी येथे घडली. गोदामामधील बारदाने, तेलाचे रिकामे डबे, बॅरल यांनी पेट घेतल्याने लागलेली भीषण आग विझता–विझत नव्हती. ती विझवण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. यामुळे मालकाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार गेल्या अनेक वर्षांपासून भानुशाली नामक व्यक्तीचे मिरजोळी येथे जंगल भागात गोदाम आहे. येथे कायम बारदाने, तेलाचे रिकामे डबे, बॅरल यासह अन्य साहित्याचा मोठा साठा असतो. असे असताना सोमवारी दुपारी 2 वाजता या गोदाम परिसरातील जंगलातून वणवा आला. यावेळी वारा असल्याने काही वेळातच या वणव्याने गोदामामध्ये प्रवेश केला. त्यामुळे गोदामामधील बारदाने, तेलाचे रिकामे डबे, बॅरल यांनी क्षणार्धात पेट घेतला व आग भडकली.

काही कळायच्या आतच आगीने रौद्र रुप धारण केले. यामुळे हवेत धुराचे मोठ्या प्रमाणात लोळ पसरले. हा प्रकार ग्रामस्थांच्या लक्षात येताच, याची माहिती नगर परिषदेच्या अग्निशमन विभागाला देण्यात आली. त्यानुसार बंब व पाणीपुरवठा करणारा टँकर येथे नेण्यात आला. पाण्याचा सर्व बाजूंनी मारा करुनही आग आटोक्यात येण्याऐवजी अधिकच भडकत होती. त्यामुळे खेड तालुक्यातील लोटे एमआयडीसी, खेड नगर परिषद यांच्याही बंबाना बोलावण्यात आले. त्यानुसार तीन बंब, पाण्याचा टँकर याने आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न कर्मचारी करीत होते. त्यांना ग्रामस्थांनीही सहकार्य केले. तरीही रात्री उशिरापर्यंत आग पूर्णपणे विझवण्यात यश आले नव्हते.
- बाजूला हॉस्पिटल अन् शाळा
ज्या गोदामाला भीषण आग लागली त्याच्या बाजूलाच लाईफकेअर हॉस्पिटल व शाळा आहे. तसेच दुसऱ्या बाजूला रहिवासी संकुल आहेत. त्यामुळे मोठी भीती निर्माण झाली होती. धुरामुळे परिसरात त्रास होत होता.
- बघ्यांची गर्दी अन फोटोग्राफी
आगीची माहिती मिळताच शहरातूनही अनेकांनी येथे धाव घेतली. त्यातील काहींनी मदतकार्यात सहभाग घेतला असला तरी अनेकजण बघ्याच्या भूमिकेत होते. तर काहींनी फोटोग्राफी करण्यात धन्यता मानली. अनेकजण तर आगीपर्यंत गेले. त्यामुळे मदतकार्यात अडचणी येत होत्या.








