कर्नाटकातील कागोडू येथे कारवाई : मद्याची तस्करी करीत असल्याचा आरोप
पणजी : मद्य तस्करी प्रकरणाला आळा बसावा म्हणून देखरेख ठेवण्याचे काम अबकारी खाते करीत असते. मात्र अबकारी खात्याचे निरीक्षकच मद्याची तस्करी करू लागले तर कुणाकडे पहावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. अबकारी खात्यात काम करणाऱ्या एका निरीक्षकाला कर्नाटकातील शिवमोगा जिह्यातील सागर शहरातील कागोडू येथे कर्नाटक अबकारी विभागाने गोवा बनावटीच्या मद्य तस्करी प्रकरणात अटक केली आहे. तसेच त्याच्या गाडीतून 138.06 लीटर गोवा बनावटीचे मद्य जप्त केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार संशयित निरीक्षकाचे नाव प्रमोद जुवेकर असून तो दक्षिण गोव्यातील बेतूल येथील आहे. अबकारी खात्यामार्फत त्याला एका मद्य तयार करणाऱ्या फॅक्टरीत देखरेखीसाठी नियुक्त करण्यात आले होते. मात्र अधिक पैसा मिळविण्याच्या आशेने तो नोकरी बरोबरच मद्य तस्करी करण्याचे काम करीत असल्याचे उघड झाले. त्याच्या विरोधात कर्नाटक उत्पादन शुल्क कायदा, 1965 च्या कलम 32(ए), 38(ए) आणि 43(ए) अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली आहे.
प्रमोद जुवेकर हा आपल्या जीए 08 एफ 3312 या कारमधून सागर अबकारी विभागातील कागोडू येथील स्मशानभूमीजवळ असलेल्या शेतात आपल्या कारमध्ये दारू घेऊन थांबला होता. या प्रकाराची माहिती अबकारी विभागाला मिळाली होती. त्यानुसार अबकारी विभागाने कारवाई करुन त्याला रंगेहात अटक केली. या कारवाईत उत्पादन शुल्क उपअधीक्षक शीला दर्जकर, निरीक्षक भाग्यलक्ष्मी, कर्मचारी संदीप एल. सी., गुऊमूर्ती, दीपक, मल्लिकार्जुन आणि सचिन यांचा सहभाग होता. प्रमोद जुवेकर याला निलंबित करण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. कर्नाटक अबकारी विभागाने या निरीक्षकाच्या अटकेबाबत गोवा अबकारी खात्याला कळविले असता प्रमोद जुवेकर याला त्वरित निलंबित करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.









