वारंवार घटनांमुळे प्रवाशांत भीती : पोलीस बंदोबस्त वाढवण्याची मागणी
बेळगाव : येथील मध्यवर्ती बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेत महिलांच्या अंगावरील व बॅगेतील दागिने पळविण्याचे प्रकार वाढले आहेत. गेल्या दहा दिवसांत दोन महिला प्रवाशांचे दागिने पळविल्याच्या घटना घडल्या असून रविवारी मार्केट पोलीस स्थानकात दोन्ही घटनांची नोंद झाली आहे. 6 मार्च रोजी बिना प्रताप कदम, राहणार कदम गल्ली, मांजरी, ता. चिकोडी, सध्या रा. गुड्सशेड रोड, चौथा क्रॉस या महिलेच्या गळ्यातील सुमारे पाऊण लाख रुपये किमतीचे व 13 ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र पळविण्यात आले आहे. सकाळी 8 वाजता बेळगाव-शक्तीनगर (रायचूर) बसमध्ये चढताना ही घटना घडली आहे. दुसरी घटना 12 मार्च रोजी घडली आहे. यासंबंधी सरोजिनी रुद्रय्या देवगावीमठ, राहणार बणगार गल्ली, गोकाक यांनी फिर्याद दिली आहे.
12 मार्च रोजी पूजा व पौर्णिमा या आपल्या दोन मुलांसमवेत नातेवाईकांच्या लग्नाला जाण्यासाठी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास त्या गोकाकमध्ये परिवहन मंडळाच्या बसमध्ये बसल्या. दुपारी 12 वा. बस मध्यवर्ती बसस्थानकावर पोहोचली. बसमधून खाली उतरताना सरोजिनी यांच्या व्हॅनिटी बॅगमधील 1 लाख 30 हजार रुपये किमतीचे 20 ग्रॅम सोन्याचे दागिने अज्ञातांनी पळविले आहेत. रविवार दि. 16 मार्च रोजी या दोन्ही घटनांची नोंद झाली आहे. पोलीस निरीक्षक महांतेश धामण्णावर पुढील तपास करीत आहेत. 3 फेब्रुवारी 2025 रोजी मध्यवर्ती बसस्थानकावर संभाजी गल्ली, पहिला क्रॉस, महाद्वार रोड येथील रश्मी राजेंद्र राजमाने यांच्या दागिन्यांची चोरी झाली होती. या प्रकरणी 10 फेब्रुवारी रोजी मार्केट पोलिसांनी बुद्धनगर-निपाणी येथील तीन महिलांना अटक करून चोरीचे दागिने जप्त केले होते. या कारवाईनंतरही मध्यवर्ती बसस्थानकावर दागिने चोरण्याचे प्रकार सुरूच आहेत.









