पर्यावरण तसेच वन्यजीवांची घेतली माहिती
बेळगाव : केएलएस आयएमईआर एमबीए विभागाच्या तिसऱ्या सेमिस्टरच्या विद्यार्थ्यांनी वनविभागाच्या सहकार्याने भीमगड वन्यजीव अभयारण्याला भेट दिली. वन्यजीव संवर्धनाबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागृती व्हावी, या उद्देशाने दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. आरएफओ सय्यदसाब नदाफ यांनी विद्यार्थ्यांना अभयारण्याची माहिती दिली. खानापूर वनक्षेत्रामध्ये आढळणारे प्राणी, झाडे व दुर्मीळ वनस्पतींची माहिती विद्यार्थ्यांना करून देण्यात आली. त्याचबरोबर वन्यजीव संरक्षण भविष्यासाठी किती महत्त्वाचे आहे, याची जाणीव त्यांना करून देण्यात आली. कॉलेजच्या गव्हर्निंग कौन्सिलचे चेअरमन आर. एस. मुतालिक यांच्या संकल्पनेतून हा दौरा आयोजित करण्यात आला होता. यावेळी संचालक डॉ. अरिफ शेख, डॉ. जॉर्ज रॉड्रिग्ज, प्रा. सविता कुलकर्णी, प्रा. रश्मी हरती यासह इतर उपस्थित होते.









