नऊ दिवस होणार यात्रा : विविध कार्यक्रमांचे आयोजन
बेळगाव : मोदगा गावची ग्रामदेवता महालक्ष्मी देवी यात्रेला मंगळवार दि. 18 रोजीपासून सुऊवात होणार आहे. गावात 9 वर्षांनंतर यात्रा भरविण्यात येत असल्यामुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. ही यात्रा नऊ दिवस होणार आहे. गावात यात्रेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. महालक्ष्मी देवी गदगेवर विराजमान होण्यासाठी भव्य असा सभामंडप उभारण्यात आलेला आहे. देवस्थान पंच कमिटी, यात्रा कमिटी व ग्राम पंचायतीच्यावतीने यात्रेसाठी येणाऱ्या भक्तांची सोय करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. महिला व बाल कल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर व विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांच्या विशेष प्रयत्नातून यात्रेसाठी विशेष निधी मंजूर करून गावातील रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण व गावचा विकास करण्यात आलेला आहे. भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे, अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे.
यासाठी ग्राम पंचायत अध्यक्ष, सदस्य व पीडीओ यांचे अधिक सहकार्य लाभले आहे. मंगळवार दि. 18 रोजी सायंकाळी प्रतिष्ठापना कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर रात्री 2 ते बुधवार दि. 19 रोजी सायंकाळी 5 पर्यंत पारंपरिक वाद्यांच्या गजरात महालक्ष्मी देवीची गावात मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यानंतर देवी गदगेवर विराजमान होणार आहे. दि. 21 व 25 रोजी मानकरी व गावकऱ्यांच्यावतीने सामूहिक ओटी भरण्याचा कार्यक्रम होणार आहे. या यात्रेनिमित्त विविध मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत. गावात प्रत्येकांच्या घरोघरी यात्रेची तयारी करण्यात आलेली आहे. प्रत्येकाने पै-पाहुणे व मित्रमंडळींना आमंत्रण दिले आहे. तसेच घरांना रंगरंगोटी करण्यात आलेली आहे. 9 दिवस विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. या यात्रेची दि. 26 रोजी सांगता होणार आहे. यात्रेचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे कळविण्यात आले आहे.









