चोरे :
आपल्या गर्द सोनेरी पिवळ्या रंगांची उधळण करणारा बहावा अनेक ठिकाणी फुललेला पहावयास मिळत आहे. पिवळ्या धमक रंगाची झुंबरे जणू निसर्ग लटकवून ठेवत असल्याचा भास या झाडाजवळ जाताना होतो. चांदण्या रात्रीत बहाव्याचे झाड अगदीच आकर्षक दिसते. बागेत रस्ताच्या कडेला अनेक ठिकाणी बहावा सोनेरी रंगांची उधळण करताना दिसत आहे.
बहावा हा कडक उन्हाची सुरुवात व संपूर्ण फुलला की दीड महिन्यात पाऊस सुरू होण्याची चाहूल देणारा वृक्ष आहे. मार्च ते एप्रिल दरम्यान हा वृक्ष पूर्णपणे फुलतो. पानगळ होऊन संपूर्ण झाड हळूहळू पिवळ्या धमक सोनेरी रंगाच्या टोपरी फुलांनी गजबजून जाते. एप्रिल महिन्यात पूर्ण झाड जणू गर्द पिवळ्या रंगाची कर्णफुले खाली लटकवत आहे, असे चित्र दिसते. आताच्या दिवसात पाने कमी व सर्व झाडावर फुले गजबजून गेलेली दिसतात.
सोनेरी रंगाच्या पिवळ्या जर्द घोसांमुळे अनेक छायाचित्रकार व निसर्गाचा अभ्यास करणाऱ्यांचे लक्ष वेधून घेणारा बहावा अनेक वृक्षांपेक्षा वेगळा बाटतो. सध्या रस्ताच्या व इमारतीच्या कडेला फुललेला बहावा पहावयास मिळेल. बहावा फुलला की साधारपणे दीड महिन्यात पाऊस सुरू होतो, अशी माहिती काही निसर्ग अभ्यासक देतात. अनेकदा याची प्रचिती आल्याचे निदर्शनास येते.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पाऊस वेळेत सुरू होईल, असे या फुलेल्या बहाव्याच्या फुलांमुळे वाटत आहे.








