कोल्हापूर :
पोलीस असल्याची बतावणी करुन दांम्पत्यास लुटणाऱ्या भामट्यास शाहूपुरी पोलिसांनी जेरबंद केले. त्याच्याकडून लुटीतील एक मोबाईल, सहाशे रुपये, गुह्यात वापरलेली दुचाकी असा सुमारे 55 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. महेश निवृत्ती पाटील (वय 34 रा. आवळी, देवळे ता. पन्हाळा) असे त्याचे नांव आहे. याबाबतची फिर्याद निलेश कोंडीबा सावंत (वय 32 रा. बालाजी पार्क, मणेर मळा) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिली होती.
याबाबत अधिक माहिती अशी की, निलेश सावंत हे बुधवार (12 मार्च) रोजी रात्री शाहूपुरी येथील वामन हॉटेल येथे आले होते. यावेळी एका भामट्याने त्यांना अडवून आपण शाहूपुरी पोलीस ठाण्याचे कर्मचारी असून, नाईट ड्युटी सुरु आहे. मार्च एडींगमुळे लेट नाईट 1 हजार रुपये दंड भरावा लागेल तसेच आई वडीलांना पोलीस स्टेशनला बोलवणार असल्याची धमकी निलेश व त्यांच्या पत्नीस दिली. घाबरलेल्या निलेशने ऑनलाईन 600 रुपये ट्रान्स्फर करुन मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेतला. निलेश सावंत यांनी याबाबतची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिली होती. पोलिसांनी सिसीटीव्ही फुटेज आणी ऑनलाईन पेमेंटच्या डिटेल्सवरुन हा गुन्हा महेश पाटील याने केल्याचे निष्पण्ण झाले. शनिवारी रात्री त्याला मार्केट यार्ड परिसरातून जेरबंद करण्यात आले. रविवारी त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.
पोलीस निरीक्षक संतोष डोके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार संदीप जाधव, मिलींद बांगर, सुशिलकुमार गायकवाड, सनिराज पाटील, रविकुमार आंबेकर, विकास चौगले, बाबा ढाकणे, अमोल पाटील, राहुल पाटील यांनी ही कारवाई केली.








