सरकारी दस्तावेज, दाखले, बिल, पावत्या सहज होणार उपलब्ध
पणजी : राज्य सरकारने गोमंतकीय जनतेला सरकारी दस्तावेज, विविध प्रकारचे दाखले, बिल, पेमेंट पावत्या सहज उपलब्ध व्हाव्यात या दृष्टीकोनातून व्हॉट्सअॅपद्वारे गोवा ऑनलाईन सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्स खात्याच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. गोवा ऑनलाईन हे वेब-आधारित माध्यम 2017 मध्ये स्व. डॉ. मनोहर पर्रीकर यांच्या मार्गदर्शनाखाली व आयटी मंत्री रोहन खंवटे यांच्या पाठिंब्याने सुरू करण्यात आले होते. हे ऑनलाईन माध्यम सर्व नागरिकांसाठी विशेषत: महामारीच्या काळात वरदान ठरले होते. नवीन एआय-सहाय्यित माध्यम नागरिकांना आणखी चांगला अनुभव देऊन व्हॉट्सअॅपद्वारे 241 यावर सरकारी सेवांमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे.
मंत्री रोहन खंवटे यांनी सांगितले की, सरकारी सेवा अधिक कार्यक्षम आणि सुलभ बनवण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. मॅन्युअल प्रक्रियेतून गोवा ऑनलाईन नावाच्या वेब आधारित माध्यमाची सुरुवात त्यानंतर ‘ग्रामीण मित्र’च्या सहाय्याने कधीही, कुठेही नागरिकांना दारी सेवा वितरण आणि आता थेट व्हॉट्सअॅपद्वारे नागरिकांपर्यंत सरकारी सेवा पोहोचवत आहोत. ही सुविधा डिजिटल सशक्तीकरणातील एक महत्त्वपूर्ण झेप दर्शवते. तसेच सार्वजनिक सेवा नागरिकांच्या दारापाशी ते बोटांच्या क्लिकपर्यंत पोचणार याची खात्री करते, असेही मंत्री खंवटे यांनी सांगितले.
कीवर्ड आधारित प्रणाली देण्याचा सरकारचा प्रयत्न
गोवा सरकारच्या व्हॉट्सअॅप आधारित सेवेचे उद्दिष्ट प्रशासन खऱ्या अर्थाने लोक केंद्रित बनविणे आणि सरकारी सेवा सहज उपलब्ध करून देणे हे आहे. अशाप्रकारे गोवा सरकार वापरकर्त्यांना विविध सेवा कार्यक्षमतेने हाताळण्यास मदत करण्यासाठी कीवर्ड आधारित प्रणाली देण्याचा प्रयत्न करत आहे. या एकत्रीकरणासह गोवा ऑनलाईनचे वापरकर्ते त्यांच्या अर्जांची स्थिती तपासू शकतात. देय तारखेचे स्मरणपत्र मिळवू शकतात. प्रत्येक स्तरावर मदत आणि सेवा-प्रवेशासाठी प्रक्रियेचे रीमाइंडर्स मिळवू शकतात तसेच व्हॉट्सअपद्वारे सर्व 241 सेवा मिळविण्यासाठी अर्ज करू शकतात, असे खंवटे म्हणाले.









