कोल्हापूर इम्रान गवंडी :
शिवाजी विद्यापीठ नावच कायम ठेवा, असा अधिसभा सदस्यांनी मांडलेला स्थगन ठराव चर्चेविना कुलगुरूंनी स्वीकारला. या स्थगन प्रस्तावावर सभागृहाचे एकमत झाले. तरीही नामविस्तारावरून वातावरण तापले आहे. विद्यापीठाच्या नामविस्तारीकरणावर मतांतरे निर्माण झाली आहेत. १८ नोव्हेंबर १९६२ रोजी विद्यापीगचे उद्घाटन झाले होते. त्यावेळीही नावावरून वाद निर्माण झाला होता. आता नामविस्तारावरून वातावरण पुन्हा तापलेय. नामविस्ताराला विरोध आणि समर्थनाचा वाद उफाळला आहे. त्यातूनच नामविस्तारासाठी सोमवारी कोल्हापुरात मोर्चा निघत आहे. या पार्श्वभूमीवर मान्यवरांनी ‘तरूण भारत संवाद’ला दिलेल्या प्रतिक्रिया…
एकीकडे शिवाजी विद्यापीठ या नावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपूर्ण व एकेरी उल्लेख होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव अधिक सन्मानाने व पूर्ण स्वरूपात व्हावे, यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ असे नामकरण करण्यात यावे, अशी ठाम भुमिका हिंदुत्ववादी संघटनांनी केली आहे.
तर दुसरीकडे पुरोगामी संघटना, ज्येष्ठ इतिहास संशोधक, अभ्यासकांककडून शिवाजी विद्यापीठ हे नाव तमाम कोल्हापुरकरांची अस्मिता असुन ते कदापीही बदलू देणार नाही. नामविस्तार केल्यास विद्यापीठाचे नाव लघुरूपात घेतले जाईल. व यातून शिवाजी महाराजांचे नाव बाजूला होईल. जसे की मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा उल्लेख सीएसटी करतात तसाच शिवाजी विद्यापीठाचाही हाईल. यामुळे मुळ नाव व ओळख पुसली जाईल. त्यामुळे शिवाजी विद्यापीठाच्या नामविस्ताराला कायम विरोधच राहणार आहे, अशी ठाम भुमिका घेण्यात आली आहे.
- नामविस्ताराशिवाय मागे हटणार नाही
काही लोक नामविस्ताराला विरोध करतात ही दुर्दैवाची बाब आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख कदापीही सहन करणार नाही. राज्यासह देशातील इतर गावे, स्थळांची नावे बदलली जातात. मग शिवाजी विद्यापीठाचे नामविस्तार का होऊ शकत नाही. नामविस्ताराच्या प्रखर भुमिकेने पुढे आलो आहे. आता नामविस्तार झाल्याशिवाय मागे हटणार नाही. शिवाजी विद्यापीठाला छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असे पूर्ण नाव देण्यास काहींना वावडे का होत आहे.
सुनिल घनवट, राष्ट्रीय संघटक, हिंदु राष्ट्र समन्वय समिती
- नामविस्ताराची लढाई जिंकल्याशिवाय गप्प बसणार नाही
नगामविस्ताराला कोण व कशासाठी विरोध करत आहेत. फार पूर्वीपासून नामविस्ताराची मागणी केली जात आहे. मात्र, याला विरोध होत असल्याने आत्तापर्यंत केवळ आश्वासने दिली जात आहेत. विद्यापीठाच्या नामविस्तारासाठी आंदोलन करावे लागते हेच दुर्दैव आहे. महापुरूषांच्या नावाचा एकेरी उल्लेख होईल ही संस्कृती नाही. रस्त्यावर उतरून प्रशासनाला नामविस्तार करण्यास भाग पाडू. नाम विस्ताराची लढाई जिंकल्याशिवाय गप्प बसणार नाही.
प्रमोद पाटील, अध्यक्ष, छत्रपती ग्रुप
- प्रशासनाने नामविस्तारासाठी पावले उचलावी
सातारा, सांगली, कोल्हापूरसह बेळगाव येथून श्री संप्रदायाच्या भक्तगणांकडून नामविस्तारसाठी आग्रही भुमिका घेतली आहे. आत नामविस्तार केल्याशिवाय माघार घेणार नाही. नामविस्ताराची अनेक वर्षापासूनची मागणी प्रलंबित आहे. प्रशासनाने नामविस्ताराच्यादृष्टीने योग्य पावले उचलणे अपेक्षित आहे.
विजय पाटील, श्री संप्रदाय
- नाव बदलण्याचा घाट रचला जात आहे.
छत्रपती शिवाजी महाराज हे तमाम देशवासियांचे प्रेरणास्थान आहेत. शिवाजी हा शब्दच मराठी माणसाची अस्मिता आहे. नामविस्ताराची मागणी करणाऱ्यांनी प्रथम इतिहास समजुन घ्यावा. शिवरायांचे नाव प्रत्येकाच्या नसानसात भिनले आहे. केवळ शिवाजी महाराजावंरचे खोटे प्रेम दाखविणाऱ्यांकडून शिवाजी विद्यापीठाचे नाव बदलण्याचा घाट घातला जात आहे. नामविस्तार झाला तर शिवाजी विद्यापीठातून शिवाजी महाराजांचे नावही गायब होईल. शिवाजी विद्यापीठाच्या नामविस्ताराला कायम विरोधच राहणार आहे.
डॉ. जयसिंगराव पवार, (ज्येष्ठ इतिहास संशोधक)
- छत्रपतींची बदनामी करणाऱ्यांवर कारवाईसाठी अट्टाहास का केला नाही?
एकीकडे प्रशांत कोरटकरकडून छत्रपतींची बदनामी केली जात आहे. त्याच्यावर कारवाईसाठी नामविस्ताराची मागणी करणारे काहीच बोलत नाही. मात्र, विशिष्ट प्रवृत्तीकडून नामविस्ताराचा अट्टाहास का केला जात आहे? शिवाजी विद्यापीठाच्या स्थापनेवेळी अभ्यासकांच्या विचाराने नामकरण झाले आहे. यासाठी जाणकारांची समिती नेमण्यात आली होती. नावाचे लघुरूप करून शिवाजी महाराजांचे महत्व करण्याचा प्रयत्न केला जात आहे. शिवाजी विद्यापीठ हेच नाव कायम रहावे, यासाठी आग्रही भुमिका आहे.
वसंतराव मुळीक (अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष)
- शिवरायांचे नाव पुसण्याचे षडयंत्र
नामविस्तारामुळे शिवाजी महाराजांचे नाव मागे पडू शकते. त्यांचे नाव पुसून काढण्याचे षडयंत्र रचले जात आहे. शिवरायांचे नाव सर्वांच्या मनात रहायचे असेल तर नाव बदलण्याचा प्रश्न उपस्थित करू नये. यामुळे शिवाजी महाराजांबद्दलचे खोटे प्रेम दाखवणाऱ्या प्रवृतीला सर्वांनी एकजुटीने विरोध करू.
प्रा. भालबा विभुते








