सायबर गुन्हेगारांना बँक खाती दिली उघडून : मंगळूर जिल्हा सीईएन पोलिसांकडून करण्यात आली अटकेची कारवाई
बेळगाव : डिजिटल अरेस्ट प्रकरणांनी सायबर क्राईम विभागाची डोकेदुखी वाढली आहे. अशा प्रकरणातील गुन्हेगारांचा शोध घेण्याचे आव्हान पोलीस दलासमोर असते. डिजिटल अरेस्ट प्रकरणात प्रथमच बेळगाव येथील दोघा तरुणांचा सहभाग आढळून आला असून मंगळूर येथील सीईएन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दोघा जणांना अटक केली आहे. झटपट पैसे मिळविण्यासाठी डिजिटल अरेस्ट करणाऱ्या गुन्हेगारांना मदत केल्याच्या आरोपावरून मंगळूर सीईएन पोलिसांनी गेल्या आठवड्यात बेळगावात कारवाई केली आहे. त्यांच्या चौकशीत धक्कादायक माहिती उघडकीस आली असून लखनौत बसून मंगळूर येथील वृद्ध शेतकऱ्याला ठकवणाऱ्या सायबर गुन्हेगारांना बेळगावातून मदत केल्याचे उघडकीस आले आहे.
अनुप विजय कारेकर (वय 42) रा. रामदेव गल्ली, वडगाव, अविनाश विठ्ठल सुतार (वय 28) रा. ताशिलदार गल्ली अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याजवळून 19 बँक खात्यांसंबंधीची कागदपत्रे, 18 चेकबुक, 15 एटीएम कार्ड व 14 मोबाईल सीमकार्ड जप्त करण्यात आली आहेत. मंगळूर जिल्हा सीईएनचे पोलीस उपअधीक्षक मंजुनाथ आर. जी. यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक युनुस आर. गड्डेकर व नागाप्पा बेनकट्टी आदींनी 10 मार्च रोजी बेळगाव येथे दोघा जणांना अटक केली आहे. त्यांना मंगळूरला नेऊन न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे. या दोघा जणांच्या चौकशीतून डिजिटल अरेस्ट प्रकरणातील बेळगाव कनेक्शनचा उलगडा झाला आहे.
15 फेब्रुवारी 2025 रोजी पुत्तूर तालुक्यातील राधाकृष्ण नायक (वय 64) या वृद्ध शेतकऱ्याशी व्हॉट्सअपवरून संपर्क साधून मनी लँड्रींग प्रकरणात तुम्हाला डिजिटल अरेस्ट करण्यात आले आहे, असे सांगत या वृद्धाला घाबरवून त्याच्या बँक खात्यातून 40 लाख रुपये जमा करून घेण्यात आले होते. यासंबंधी दक्षिण कन्नड जिल्हा सीईएन पोलीस स्थानकात एफआयआर दाखल झाला होता. पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला असून लखनौमधून सायबर गुन्हेगारांनी या वृद्ध शेतकऱ्याला ठकवल्याचे उघडकीस आले आहे. याकामी बेळगाव येथील दोघा जणांनी त्यांना मदत केली आहे. अनुपच्या बँक खात्यात काही रक्कम जमा झाली होती तर अविनाशने कमिशनवर वेगवेगळ्या लोकांच्या नावे त्यांना बँक खाते उघडून दिल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे एकच खळबळ माजली आहे.
झटपट पैसे कमावण्यासाठी सायबर गुन्हेगारांच्या संपर्कात
झटपट पैसे कमावण्यासाठी अविनाशने एकदा गुगलवर सर्च केले. बँक पासबुक उघडून दिल्यास कमिशन देण्यात येईल, अशी माहिती देणारी एक लिंक त्याला सापडली. त्यानंतर तो सायबर गुन्हेगारांच्या संपर्कात आला. वेगवेगळ्या लोकांच्या नावे त्याने 19 बँक खाती उघडली आहेत. डिजिटल अरेस्ट प्रकरणात गुंतलेल्या सायबर गुन्हेगारांना साहाय्य करणारे तरुण बेळगावचे असल्याचे उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ माजली आहे.









