बुडाकडून ई-निविदा जारी : 15 महिन्यांत करावे लागणार काम पूर्ण
बेळगाव : बेळगाव शहरासह तालुक्यातील 55 गावांचा मास्टर प्लॅन तयार करण्यासाठी बुडाकडून 1 कोटी 88 लाख 86 हजार 385 रुपयांची निविदा काढण्यात आली आहे. यासाठी कन्सल्टंट कंपनीकडून ई-निविदा मागविण्यात आली असून यासाठी 2 लाख 70 हजार रुपयांची अनामत रक्कम ठेवावी लागणार आहे. तसेच सदर मास्टर प्लॅनचे काम 15 महिन्यांत पूर्ण करावे लागणार आहे. सहा महिन्यांपूर्वी बुडाने मास्टर प्लॅन निर्मितीचा खर्च निश्चिती करण्यासाठी निविदा काढली होती. त्यावेळी काही कन्सल्टंट कंपन्यांकडून निविदा दाखल करण्यात आली होती पण तांत्रिक कारणास्तव नगर विकास खात्याकडून त्या निविदा रद्द करण्यात आल्या होत्या. याच कामासाठी पुन्हा फेरनिविदा काढण्यास मंजुरी देण्यात आली होती. त्यानुसार मास्टर प्लॅनच्या कामासाठी खर्च निश्चित करून बुडाकडून निविदा मागविण्यात आली आहे. बेळगावच्या मास्टर प्लॅनचे 2020 पासून घोडे अडले आहे. मास्टर प्लॅन तयार करण्यासाठी अमृत योजनेतून निधी मंजूर झाला होता.
राज्य सरकारकडून निविदा काढत त्यावेळी मास्टर प्लॅनसाठी ठेकेदार निश्चित करण्यात आला होता. बेळगाव शहरासह तालुक्यातील 27 गावांचा मास्टर प्लॅन तयार करण्यासाठी सप्टेंबर 2020 मध्ये इजीआयएस या कंपनीला ठेका देण्यात आला होता. पण काही कारणामुळे कंपनीला ते काम वेळेत पूर्ण करता आले नव्हते. बिलाच्या मुद्यावरून कंपनी आणि नगरविकास खात्याचे बिनसले होते. त्यामुळे 2023 मध्ये कंपनीचा ठेका रद्द करण्यात आला. त्यानंतर मास्टर प्लॅन तयार करण्याची जबाबदारी शासनाकडून बुडाला देण्यात आली आहे. मध्यंतरी बेळगाव तालुक्यातील आणखी 28 गावांचा समावेश बुडामध्ये करण्यात आला. या नव्याने समावेश करण्यात आलेल्या गावांसह नवा मास्टर प्लॅन तयार करण्याचा निर्णय बुडाने 5 सप्टेंबर 2023 रोजी झालेल्या बैठकीत घेतला होता. पण काही तांत्रिक कामामुळे निविदा काढण्यास विलंब झाला आहे. खरे तर 27 फेब्रुवारी रोजी निविदा काढणे गरजेचे होते. पण मास्टर प्लॅनसाठी 16 मार्चला निविदा काढण्यात आली आहे. तब्बल 1 कोटी 88 लाख 86 हजार 385 रुपयांची निविदा काढण्यात आली असून यासाठी संबंधित कन्सल्टंट कंपनीकडून 2 लाख 70 हजार रुपयांची अनामत रक्कम बुडाला भरावी लागणार आहे. तसेच मास्टर प्लॅनचे काम 15 महिन्यांत पूर्ण करावे लागणार आहे.
एनएची कामे रेंगाळणार
बेळगाव शहरासह तालुक्यातील 55 गावांचा समावेश बुडामध्ये करण्यात आला आहे. यासाठी कन्सल्टंट कंपनीकडून निविदा मागविण्यात आली असून मास्टर प्लॅन तयार करण्यासाठी ठेकेदार निश्चित केला जाणार आहे. मास्टर प्लॅन तयार होईपर्यंत 55 गावांमधील जमिनीच्या एनएच्या प्रक्रियेला स्थगिती असून त्यामुळे मास्टर प्लॅन तयार होईपर्यंत शेतीच्या एनएची कामे रेंगाळणार आहेत.









