कोल्हापूर / सुधाकर काशीद :
हिंदकेसरी, पैलवान गणपतराव आंदळकर यांच्या पत्नी सुनेत्रा आंदळकर यांचे शनिवारी निधन झाले. पती क्रीडाविश्वातील कुस्ती क्षेत्रातील हिंदकेसरी तर पत्नी सुनेत्रा या चित्रकलेत पारंगत.. आपापली कौशल्ये सांभाळत आंदळकरांचा संसार फुलला. सुनेत्रा आंदळकर यांच्या आठवणींचा घेतलेला आढावा…
पैलवान गणपतराव आंदळकर आणि पत्नी सुनेत्रा या दोघांच्या कलेत टोकाचा फरक. हे लाल मातीत उतरले, शड्डू ठोकला की सारे मैदान सरसरून उठायचे. मावळत्या किरणांच्या चमकदार प्रकाशात यांचे अंग चमकायला लागायचे. काही क्षणात यांच्या पिळदार शरीरावर घामाचे थेंब टपकू लागायचे आणि शरीर लाल मातीशी एकरूप होऊन जायचे. कुस्ती जिंकली की एका पायावर त्यांची हनुमान उडी ठरलेली असायची आणि मैदानातल्या कुस्ती शौकिनांकडून त्यांना मानाची सलामी मिळायची.
याउलट त्यांच्या पत्नी सुनेत्रा. एका सर्वसामान्य मराठी कुटुंबातल्या ताई, वहिनी, अक्का जशा असतात तशा. डोक्यावर कायम पदर, कपाळावर कुंकू. सकाळी यांच्या हातात स्वयंपाकाची भांडी आणि दुपारनंतर त्यांच्या हातात चक्क रंगपेटी आणि ब्रश. ब्रशच्या सहाय्याने रंगाच्या हलक्या–हलक्या फटकाऱ्यातून त्या चित्र साकारायच्या. जणू काही संसारात रोज नवा रंग भरत जायच्या.
हिंदकेसरी व कोल्हापूरच्या लाल मातीतले मल्ल गणपत आंदळकर आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा यांच्या कुटुंबाची ही छोटीशी कथा. तीन वर्षापूर्वी आंदळकर यांचा मृत्यू झाला आणि काल सुनेत्रा वहिनींचा मृत्यू झाला आणि पैलवान व एका चित्रकाराच्या जोडीचा एक अनोखा प्रवास थांबला.
पैलवान आंदळकर इतके लोकप्रिय की त्यांच्या कुस्ती कौशल्यावर दंतकथाही तयार झाल्या होत्या. त्यांचा विवाह मुंबई येथील सुनेत्रा यांच्याशी झाला. कोणी या विवाहाला प्रेमविवाह तर कोणी अॅरेंज विवाह म्हणून लागले. सुनेत्रा या जी.डी. आर्ट मुंबईच्या जे.जे. आर्टस्मधून झालेल्या. पैलवान आंदळकरांशी त्यांचा विवाह झाला. एक पैलवान आणि एक चित्रकार यांचा संसार कसा फुलायचा, असे अनेक जण त्या काळात म्हणत होते. पण सुनेत्रा वहिनी आंदळकरांच्या पैलवानकीशी अगदी एकरूप होऊन गेल्या.
पहाटे चारला त्यांच्या घराला जाग यायची. वस्ताद म्हणून आंदळकर पहाटे चारला घराबाहेर पडायचे. मंगळवार पेठेतल्या एका गल्लीतून चालत मोतीबाग तालमीत जायचे. पैलवान आंदळकर यांचा रंगांशी संबंध तसा फक्त लाल मातीशी. पण सुनेत्रा यांचा संबंध नऊ रंगांशी. त्या मंगळवार पेठेत आहार हॉटेल समोरच्या बोळात राहिल्या. दारातला लोखंडी जिना, ही त्यांच्या घराची ओळख. आणि येथे हिंदकेसरी राहतात, याचा मोठेपणा साऱ्या पेठेला होता.
कुस्तीच्या मैदानातले आंदळकर यांचा वावर आणि शेवटपर्यंत त्यांचा दबदबा वेगळाच होता. त्यांचा आहार, त्यांची दिनचर्या यावर सुनेत्रा यांचे कायम लक्ष असायचे. आंदळकर यांची शरीरयष्टी व त्यांचा दबदबा. त्यामुळे पंचक्रोशीत त्यांचे नाव होते. सुनेत्रा वाहिनी आंदळकरांची कायम दृष्ट काढायच्या आणि आपल्या नवऱ्याला जपायच्या. एका हिंदकेसरी पैलवानाची बायको म्हणून त्यांनी आपल्या चित्रकलेकडे जराही दुर्लक्ष केले नाही. आपली कला त्या घरातही जपू लागल्या. नवोदित चित्रकारांना शिकवू लागल्या. त्या आपली चित्रे आंदळकरांना दाखवायच्या आणि ‘झकास’ ही ठरलेली प्रतिक्रिया मिळवायच्या.
कुस्तीतल्या हिंदकेसरीनंतर गणपतराव आंदळकर शिराळा साखर कारखान्याच्या राजकारणात उतरले. कारखान्याचे चेअरमन झाले. कुस्तीच्या राजकारणात उतरले. त्या काळात सुनेत्रा वहिनी त्यांच्या पूर्ण पाठीशी राहिल्या. आंदळकर यांचा मृत्यू सुनेत्रा वहिनींच्या मनाला खूप लागून गेला. आपल्या जीवनातला रंगच गेला, असं म्हणत चित्रकलेपासून त्या थोड्या लांब–लांब राहू लागल्या. मुलगा अभिजीत, सून ममता, नातू आदेश आणि ऐश्वर्या यांच्यासोबत त्या वेळ घालवायला लागल्या. त्या आजारी नव्हत्या, पण माझ्या आयुष्यातला रंग निघून गेलाय, असं वारंवार म्हणत पैलवान आंदळकरांच्या आठवणी त्या ताज्यातवान्या ठेवायच्या.








