आरोग्याचा प्रश्न गंभीर, नगराध्यक्षांनी गांभीर्याने घेणे गरजेचे, दूषित पाण्याचा पुरवठा बंद करण्याची मागणी
खानापूर : शहराजवळून वाहणाऱ्या मलप्रभेच्या पात्रातील पाण्यात सांडपाणी मिसळत असल्याने पूर्णपणे दूषित झाले आहे. याच पाण्याचा शहराला पाणीपुरवठा योजनेद्वारे हा पाणीपुरवठा करण्यात येतो. शहराचे सांडपाणी नदीत मिसळत असल्याने तसेच शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी नव्याने बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यात पाणी अडवण्यात आल्याने मलप्रभा नदीचे पाणी दूषित झाले आहे. हेच पाणी शहराला पुरवण्यात येते. त्यामुळे शहरवासियांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. नगरपंचायतीची पाणी शुद्ध करण्याची यंत्रणा जुनी असून कुचकामी आहे. तसेच दूषित पाणी शुद्ध होत नसल्याने तसेच नगराध्यक्ष आणि नगरसेवकांनी याकडे साफ दुर्लक्ष केल्याने शहरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. दूषित झालेले पाणी शहराला पुरवण्यात येवू नये, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
मलप्रभा नदी कणकुंबीत उगम पावून कुडसंगमला जाऊन अरबी समुद्राला मिळते. असोग्यापर्यंत या नदीचे पाणी अजिबात दूषित होत नाही. मात्र खानापूर शहरासह सर्व उपनगरांचे सांडपाणी पूर्णपणे नदीत सोडले जाते. त्यामुळे मलप्रभेचे पाणी खानापूर शहरापासून दूषित होण्यास सुरुवात होते. नोव्हेंबरपर्यंत हे पाणी वाहते असल्याने याचा परिणाम जाणवत नाही. शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी नव्याने बांधण्यात आलेला ब्रिज कम बंधाऱ्यात फळ्या घालून पाणी अडविण्यात येते. जानेवारी महिन्यापर्यंत पाणी वाहते असते. जानेवारीनंतर नदीच्या पात्रातील पाणी कमी झाल्याने पाणी वाहने थांबते. त्यामुळे शहराचे सांडपाणी नदीत मिसळत असल्याने हे ंपाणी पूर्णपणे दूषित होते.
सध्या ब्रिज कम बंधाऱ्याखाली पात्र पूर्णपणे कोरडे पडलेले आहे. तसेच अडवलेल्या ठिकाणी शहरातील सांडपाणी मिसळत असल्याने हे पाणी पूर्णपणे काळेकुट्ट आणि दूषित झाले आहे. हेच पाणी जॅकवेलद्वारे खेचून शुद्ध करून शहराला पुरविण्यात येते. नगरपंचायतीची पाणी शुद्ध करण्याची यंत्रणा फार जुनी आहे. या ठिकाणी पूर्ण क्षमतेने पाणी शुद्ध होत नाही. तसेच काही दिवसांपासून पाणी शुद्ध करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्याचा पुरवठा सुरळीत नसल्याने हे दूषित पाणी पूर्णपणे शुद्ध न करता शहराला पुरविण्यात येत आहे. तसेच हॉटेल व्यावसायिक याच पाण्यावर आपला व्यवसाय चालवतात. त्यामुळे शहरासह खानापुरात आलेल्या नागरिकांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. याबाबत नगरपंचायतीने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.
दूषित पाण्याचा पुरवठा नगरपंचायतीने तातडीने बंद करून शहरात कार्यरत असलेल्या जवळपास 230 कूपनलिकांचे योग्य नियोजन करून शहराला शुद्ध पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. दूषित पाण्यामुळे आरोग्याचे गंभीर प्रश्न निर्माण होणार असल्याने नगरपंचायतीने तातडीने बैठक घेऊन दूषित प्रश्नांबाबत योग्य नियोजन करावे. सध्या बदललेले हवामान, वाढलेली प्रचंड उष्णता यामुळे आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले आहेत. यातच दूषित पाण्यामुळेही यावर भर पडणार आहे. यासाठी नगरपंचायतीने तातडीने क्रम घ्यावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.









