कोल्हापूर / कृष्णात चौगले :
भोगावती नदीचे पाणी कोल्हापूर–गगनबावडा राष्ट्रीय महामार्गावरील बालिंगे पुलाच्या कमानीपर्यंत आल्यामुळे हा पूल गेल्या पावसाळ्यात वाहतुकीसाठी बंद केला होता. वास्तविक कळे ते फुलेवाडी पर्यंतचा नवीन रस्ता करण्यासाठी दिलेली मुदत संपल्यानंतर पुन्हा जानेवारी 2025 पर्यंत मुदतवाढ दिली होती. पण सद्यस्थितीत या रस्त्याचे 80 टक्के काम पूर्ण झाले असून बालिंगे पुलाचे काम अद्यापही प्राथमिक टप्प्यात आहे. संबंधित राष्ट्रीय महामार्ग विभागाची अनास्था, कंपनीचा वेळकाढूपणा यामुळे यावर्षीही नवीन पुलाअभावी या मार्गावरील वाहतूक काही दिवस ठप्प होण्याची शक्यता असून पुलाच्या दोन्ही बाजूकडील भरावामुळे महापुराचा धोका पुन्हा वाढला आहे.
कोल्हापूर–गगनबावडा–तळेरे या राष्ट्रीय महामार्गाचे दुपरीकरणाचे काम सुरु आहे. त्यापैकी पहिल्या टप्यात कोल्हापूर (फुलेवाडी) कळे या 16.44 किलोमीटर रस्त्याचे दुपरीकरण सुरु असून जवळपास 80 टक्के काम पूर्ण झाले आहे. एकूण 16 मीटर रुंदीचा हा रस्ता केला जात आहे. यामध्ये 10 मीटर काँक्रीटचा रस्ता तर दोन्ही बाजूस 3 मीटरची साईड पट्टी केली आहे. केंद्रशासनाने या रस्त्यासाठी आवश्यक निधीची तरतूद केली असली तरी हे काम संथगतीने झाले आहे. त्यामुळेच बालिंगे पुलाचे काम आजही सुमारे 10 टक्केच पूर्ण झाले आहे.
बलिंगे पूल हे ब्रिटीशकालीन (1885 सालातील) आहे. या पूलाचे दगडी बांधकाम आहे. 2016 साली महाड येथील सावित्री नदीवरील पूल कोसळल्यानंतर बालिंगे येथील जुन्या पुलाचे सार्वजनिक बांधकाम विभागाने स्ट्रक्चरल ऑडीट केले होते. त्यानुसार हा पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे भक्कम आणि सुरक्षित असला तरी भोगावती नदीचे पाणी पुलाच्या कमानीपर्यंत आल्यामुळे पाण्याचा मोठा दाब पडत असल्यामुळे हा या पुलावरील वाहतूक जुलै 2023 मध्ये वाहतुकीसाठी काही दिवस बंद केला होता. त्यामुळे कळे–फुलेवाडी या नवीन रस्ते कामामध्ये समाविष्ठ असलेल्या बालिंगे येथील नवीन पुलाचे काम वर्षभरात पूर्ण होईल आणि 2025 च्या पावसाळ्यात तरी वाहतूक सुरळीत सुरु राहील असे नागरीकांना अपेक्षित होते. पण गेल्या वर्षभरात या पुलाचे काम केवळ प्राथमिक अवस्थेतच असून ते पूर्ण होण्यासाठी अजून किती कालावधी लागणार ? हे अनिश्चित आहे.
- भामटे येथील भुसंपादनाचा विषय मार्गी
भामटे ते कळंबे दरम्यानच्या वळणावरील रस्त्याचे काम अपूर्णच आहे. या रस्त्यासाठी शेतकऱ्यांची जमीन भूसंपादीत करावी लागत असल्यामुळे हे काम प्रलंबित आहे. सध्या महसूल विभागाकडून भुसंपादनाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून संबंधित शेतकऱ्यांना त्याबाबतची नोटीस पाठवली आहे. त्यामुळे लवकरच हे काम पूर्ण केले जाईल अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग विभागाचे उपअभियंता शिंदे यांनी दिली. 2017 च्या आराखड्यानुसारच हे काम होणार असून या रस्त्यावरील मोठे वळण कायम राहणार आहे. त्यामुळे हे ठिकाण अपघात क्षेत्र ठरण्याची शक्यता आहे.
- रस्त्यावर धुळीचे लोट
कळे ते मरळी दरम्यान लहान पुल बांधण्याचे काम सुरु आहे. तर भुसंपादनाअभावी भामटे येथील वळणावरील रस्त्याचे काम अपूर्णच असून ते अतिशय धोकादायक स्थितीत आहे. दोनवडे ते बालिंगे दरम्यानचा काही रस्ता देखील अपूर्ण आहे. त्यामुळे या तीन ठिकाणच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात धुळ असून वाहनधारकांना दररोज या धुळीतून ये–जा करावी लागत आहे. परिणामी आरोग्याच्या तक्रारीत वाढ होत आहे. पण संबंधित ठेकेदार कंपनीकडून धुळीचा त्रास कमी होण्यासाठी कोणतीही उपाययोजना राबविली जात नाही.
- रस्त्याचे काम निकृष्ठ दर्जाचे, वाहनधारकांचा सूर
राष्ट्रीय महामार्गाच्या मानांकनानुसार या रस्त्याचे कामकाज झाले नसल्याचे चित्र आहे. अनेक ठिकाणी रस्त्यामध्येच चढ उतार तयार झाले आहेत. तर रस्त्याचे काम सुरु असताना काँक्रीट वाळण्यापूर्वीच त्यावरून मोटरसायकली घातल्यामुळे रस्त्यावर चाकांच्या आकाराची चाकोरी तयार झाली आहे. त्यामधून प्रवास करणे दुचाकीस्वारांसाठी धोकादायक ठरत आहे. तसेच अन्य राष्ट्रीय महामार्गांच्या तुलनेत या रस्त्याचे काम निकृष्ठ दर्जाचे झाले असल्याचा वाहनधारकांचा सूर आहे.
- साईडपट्टीच्या बाजूला मातीचा भराव
कळे ते फुलेवाडीपर्यंत पूर्ण झालेल्या रस्त्याच्या साईडपट्टीच्या बाजूला ठेकेदार कंपनीने मुरुमाचा भराव टाकणे अपेक्षित होते. पण त्या ठिकाणी माती टाकली आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या कालावधीत त्याचा चिखल होऊन बाजूचा भराव पुन्हा खचण्याची शक्यता आहे. तसेच चिखलामुळे अपघातांचे प्रमाण देखील वाढण्याची शक्यता आहे.
- बालिंगा पुलाचे फाऊंडेशन पूर्ण
बालिंगा येथे बांधण्यात येणाऱ्या नवीन पुलाच्या फाऊंडेशनचे काम पूर्ण झाले आहे. पुलाच्या दोन्ही बाजूकडील 1 किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे काम अद्याप अपूर्ण आहे. भामटे येथील वळणावरील रस्त्यासाठी भूसंपादनाचे काम मार्गी लागल्यामुळे तो रस्ताही लवकरच पूर्ण होईल.
राजेश शिंदे , उपअभियंता, राष्ट्रीय महामार्ग








