वृत्तसंस्था/ मेलबोर्न
2025 च्या एफ-1 रेसिंग हंगामातील येथे रविवारी झालेल्या पहिल्या ऑस्ट्रेलियन ग्रा प्री एफ-1 मोटार शर्यतीचे जेतेपद मॅक्लेरेनच्या लँडो नोरिसने पटकाविले.
या शर्यतीमध्ये नोरिसने विद्यमान विजेता मॅक्स र्व्हस्टेपनला शेवटच्या काही क्षणता मागे टाकत जेतेपदावर शिक्कामोर्तब केला. मर्सिडीस चालक जॉर्ज रसेलने या शर्यतीमध्ये तिसरे स्थान मिळविले. अबू धाबीमध्ये यापूर्वी झालेल्या एफ-1 शर्यतीमध्ये नोरिसला शेवटच्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. ऑस्ट्रेलियन ग्रा प्री शर्यतीच्या सराव सत्रामध्ये नोरिसला पोल पोझिशन मिळाले होते. नोरिसच्या वैयक्तिक रेसिंग कारकिर्दीतील हे पाचवे जेतेपद असून मेलबोर्नमधील पहिले जेतेपद आहे. शर्यतीला प्रारंभ झाल्यानंतर मध्यंतरी हॅडीजेरने आपल्या वाहनावरचे नियंत्रण गमाविल्याने त्याच्या मोटारीचा अपघात झाल्याने 10 मिनिटांसाठी शर्यत थांबविण्यात आली होती. आतापर्यंत दोन वेळेला विश्व चॅम्पियनशिप मिळविणारा फर्नांडो अलोन्सो याच्या मोटारीला अपघात झाल्याने तो या शर्यतीतून बाद झाला.









