सांगली :
जिल्ह्याला संघर्ष नवा नाही . कार्यकर्त्यांनी खचून न जाता नव्या उमेदीने पक्षबांधणीच्या कामाला सुरवात करावी, समस्त ओबीसी समाजाला बरोबर घ्या , सहकारी पक्ष काय करणार यापेक्षा आपल्या पक्षाची तयारी सुरू करा असे आवाहन करत आगामी काळात संघटनात्मक पातळीवर काही बदल करणार असून सर्व निवडणूकात नव्या चेहऱ्यांना संधी देणार असल्याची घोषणा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील यांनी शनिवारी सांगलीत बोलताना केली.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपल्या बोलण्याची सुरवात जय शिवराय अशी करावी असे आवाहनही त्यांनी केले. शनिवारी आ.जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा कार्यकर्ता मेळावा सांगलीत झाला. यावेळी बोलताना आ.जयंत पाटील यांनी पक्ष वाढीच्या दृष्टीने कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी जोमाने कामाला लागण्याचे आवाहन केले.पश्चिम महाराष्ट्र प्रभारी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि आ.शशिकांत शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
आ.जयंत पाटील म्हणाले, निवडणूका कधीही लागू देत आपण आपल्या मतदारसंघात तयारी सूरू करा. कठीण परिस्थितीतही कार्यकर्ते आपल्याबरोबर आहेत. त्यामुळे आमदार किती आले यापेक्षा निष्ठावान कार्यकर्त्यांच्या साथीने पक्षबांधणी करा, महायुती सरकारने विधानसभा निवडणूकीपूर्वी लाडकी बहीण योजना राबवली, जैन,तेली,लोणारी, खाटीक यांसह सतरा महामंडळांची घोषणा केली. परंतू अर्थसंकल्पात या महामंडळासाठी एक रूपयाचीही तरतुद नाही. शासनानेही महामंडळ स्थापनेची कायदेशीर पुर्तता केलेली नाही. तर 50 लाख लाडक्या बहिणींना योजनेतून वगळण्यात आले आहे.
पक्षाच्या कार्यकर्त्यांनी फसवणूक झालेल्या लाडक्या बहिणींशी संपर्क करावा. तर कार्यकर्त्यांनी वंचित,पददलित,समस्त ओबीसी घटकांना त्यांच्या प्रश्नासाठी आश्वस्त करावे, महायुती सरकारने निवडणूकीसाठी केलेल्या घोषणा हवेत विरल्याचे त्यांना पटवून द्यावे असे आवाहन केले.
- रोहित दादा आता जिल्ह्यात संघटन वाढवा
आ.जयंत पाटील यांनी आ.रोहित पाटील यांना जिल्हयात युवकांचे संघटन वाढवण्याचे आवाहन केले. पुवीं आर. आर. आबा राज्यात फिरायचे आणि आपण जिल्हयात पहायचो. आता आबांच्या जागी तुम्हाला पाहतोय. त्यामुळे तुम्ही जिल्हयात पक्ष संघटन वाढवा, आपल्यावर राज्याची जबाबदारी आहे. जिल्हयातील सर्व संस्था राष्ट्रवादीच्या ताब्यात घेऊ असे आ.जयंत पाटील यांनी म्हणताच उपस्थितांनी टाळयांच्या गजरात त्यांना दाद दिली.
- जय शिवराय म्हणा : आ.शिंदे
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी फोनवर बोलताना जय शिवराय अशी सुरवात करावी, शिवरायांचे खरे मावळे आपण आहोत. सांगली,सातारा हे पक्षाचे बालेकिल्ले नेस्तनाबूत करण्यात आले आहेत. आपल्यातून किती गेले यापेक्षा राहिलेल्या मावळयांच्या साथीने हे बालेकिल्ले पुन्हा ताब्यात घेऊ या. आंदोलनाशिवाय पक्षाला उभारी येणार नाही. त्यामुळे बेरोजगारी, फसवणूक,रखडलेली विकासकामे यावर जनतेच्या साथीने आंदोलन उभा करा असे आवाहन पश्चिम महाराष्ट्र प्रभारी आ.शशिकांत शिंदे यांनी केले.
- आकडेमोडीच्या भ्रमात फसलो :पाटील
लोकसभेच्या यशानंतर आपण आकडेमोड करत विधानसभेला भ्रमात राहिलो. त्यामुळे पराभव झाला. आता आत्मपरिक्षण करण्याची गरज असल्याचे स्पष्ट मत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले. आता कसे होणार म्हणून घाबरू नका. विधानसभेच्य पराभवातून बोध घ्या. संघर्षाची तयारी करा जनतेसोबत रहा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
- सरकारला गुडघ्यावर आणू : आ. रोहित पाटील
यावेळी बोलताना आ.रोहित पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या जोरावर सरकारला गुडघे टेकायला लावू असा इशारा देतानाच आगामी निवडणूकांत आ.जयंत पाटील यांना जिल्हयात अडकवून ठेवण्याऐवजी त्यांना राज्यासाठी वेळ देऊ.जिल्हयाचे संघटन आपण सांघिकपणे पाहू असे सांगतानाच पक्षासाठी पडेल ते काम करू,कमीपणा मानणार नाही असेही रोहित पाटील यांनी सांगितले. आपण कष्टाने निवडूण आणलेली कवठेमहांकाळ नगरपंचायत दुसऱ्या नगराध्यक्ष निवडीवेळी विरोधकांनी काढून घेतल्याची सल आ.रोहित पाटील यांनी व्यक्त केली. परंतू आम्ही खचून न जाता त्यानंतर झालेल्या 69 ग्रामपंचायतीपैकी 60 ग्रामपंचायती आमच्या ताब्यात मिळवल्या. अशी जिद्द बाळगून काम करू या असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी आ.अरूण लाड, माजी आ.मानसिंगराव नाईक यांच्यासह विविध तालुकाध्यक्ष, सेलचे अध्यक्ष, यांची भाषणे झाली. स्वागत शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांनी तर प्रास्तविक ग्रामीण जिल्हाध्यक्ष देवराज पाटील यांनी केले. कार्यक्रमास माजी मंत्री शिवाजीराव नाईक, माजी आमदार सदाशिव पाटील, अनिता सगरे, ताजुद्दीन तांबोळी, दत्ताजीराव पाटील, हायुम सावनूरकर, वैभव शिंदे, मन्सूर खतीब, बाळासाहेब पाटील, पै.राहुल पवार, यांच्यासह जिल्ह्यातील कार्यकर्ते उपस्थित होते. आभार कार्याध्यक्ष अॅङ बाबासाहेब मुळीक यांनी मानले.
- आटपाडीवर विशेष लक्ष द्या :देशमुख, कटरे
यावेळी बोलताना आटपाडी तालुक्यावर विशेष लक्ष द्या. नेत्यांनी बळ दिल्यास आम्ही तालुक्यात पक्ष पहिल्या क्रमांकावर पोहोचवू अशी ग्वाही प्रभारी तालुकाध्यक्ष हणमंतराव देशमुख व ओबीसी जिल्हाध्यक्ष जालिंदर कटरे यांनी दिली. आ.जयंत पाटील यांच्यावर टिका होत असताना कार्यकर्ते ऐकूण घेतात. आमच्या डोळयात पाणी येते. हे आपल्या पक्षाला शोभणारे नाही. अशी खंत जालिंदर कटरे यांनी व्यक्त केली. तर स्थानिक नेते आ.जयंत पाटील यांचा पाठींबा सांगून पक्षाच्या कार्यकर्त्यांना दाबतात ,ते फसवे असल्याची टिका हणमंतराव देशमुख यांनी नाव न घेता आटपाडीच्या स्थानिक नेत्यांवर केली.








