सांगली :
सांगलीवाडी येथे धुळवडीनिमित्त एकजण भांगेच्या गोळ्या विकत असल्याची माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाला मिळाल्यानंतर पथकाने याठिकाणी छापा टाकला असता जवळपास अकरा किलो 314 ग्रॅमच्या गोळ्या एकाकडे आढळून आल्या आहेत. या सर्व गोळ्या जप्त करण्यात आल्या असून संशयिताला अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या संशयिताचे नाव दीपक राधेशाम केवट (वय 26 रा. सांगलीवाडी मूळ, कुत्रुकोडेला उत्तर प्रदेश) असे आहे. त्याच्याकडून एकूण 2 लाख 26 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, सांगलीवाडी येथे एकजण भांगेच्या गोळ्या विकत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने या परिसरात छापा टाकला असता केवट याच्याकडे काही गोळ्या आढळून आल्या. त्याला ताब्यात घेतले असता त्याच्या स्क्रॅपच्या दुकानाची झडती घेतल्यानंतर त्याठिकाणी 11 किलो 315 ग्रॅमच्या भांगेच्या गोळ्या सापडल्या. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे. त्याला तपासासाठी सांगली शहर पोलिसांकडे देण्यात आले आहे. इतक्या मोठयाप्रमाणात केवट याने भांगेच्या गोळ्या कोठून आणल्या याचा शोध पोलीस घेत आहेत. ही कारवाई स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरिक्षक नितीन सावंत, इम्रान मुल्ला, अमोळ ऐदाळे, संकेत मगदूम, अतुल माने, आमसिद्धा खोत, बाबासाहेब माने, अनंत कुडाळकर, सोमनाथ पतंगे, रोहन घस्ते यांनी केली.








