सर्वांच्या नजरा आता 15 दिवसांकडे सभापतींनंतर दामूंचेही फेरबदलावर सूतोवाच
प्रतिनिधी/ पणजी
वर्ष 2022 च्या निवडणुकीनंतर स्थापन झालेल्या सरकारने जवळजवळ अर्धा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर निदान आतातरी काही नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावे अशी अपेक्षा अनेकजण बाळगून आहेत. त्यासंबंधी अधूनमधून ‘तारखा’ आणि कालावधीही निश्चित, जाहीर होत असतात. त्यातून अनेकजण लगेच बाशिंग बांधून तयारही होतात. परंतु प्रत्यक्षात मात्र तिही राजकीय आश्वासनेच ठरत आहेत.
सध्या राज्यात याच विषयावरून पुन्हा एकदा राजकीय धुळवड सुरू झाली असून या विषयावर खुद्द सभापती रमेश तवडकर आणि भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनीही सूचक वक्तव्ये केली आहेत. त्यावरून राजकीय तसेच सामाजिक स्तरावरही चर्चेला उधाण आले आहे. पुढील 15 दिवसांत राजकीय सारीपाटावरून काहीजण चेकमेट होतील तर काही नवे चेहरे सत्तास्थानी पोहोचतील, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
यासंबंधी विचारलेल्या एका प्रश्नावर बोलताना सभापती तवडकर यांनी मंत्रिमंडळात निश्चितपणे फेरबदल होतील आणि तो दिवस दूर नाही, शक्यतो पुढील 15 दिवसांत तो विषय निकाली लागेल, असे संकेत दिले होते. मात्र सदर विषय हा मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारितील असल्याने अंतिम निर्णय तेच घेतील, असे सांगण्यासही ते विसरले नव्हते.
जे सांगायचे ते ‘ठाम’पणे सांगितले आहे : दामू
त्यानंतर काल शनिवारी याच विषयावर बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी, मंत्रिमंडळ फेरबदलाचा अधिकार हा सर्वस्वी मुख्यमंत्र्यांचा आहे. तरीही भाजप प्रदेशाध्यक्ष या नात्याने मंत्रिमंडळ फेरबदलासंबंधी बी. एल. संतोष यांना संघटन आणि सरकार यांच्याबद्दल पूर्ण कल्पना दिली आहे. तसेच फेरबदलासंबंधी जे काही सांगायचे आहे ते ठामपणे सांगितले आहे. त्याचबरोबर दोन महिन्यांचे प्रगतीपुस्तकही त्यांना सुपूर्द केले आहे, असे नाईक यांनी पुढे सांगितले.
विशेष म्हणजे, यासंबंधी निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार असलेले मुख्यमंत्री प्रमोद सावंत मात्र याप्रश्नी अद्याप काहीच बोललेले नाहीत. यापूर्वीही त्यांना याच विषयावरून प्रश्न विचारण्यात आले होते व प्रत्येक वेळी त्यांनी, योग्य वेळी योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे मोघम उत्तर देत वेळ मारून नेली होती. हा इतिहास पाहता सध्याची राजकीय धुळवडही शिमग्याच्या रंगांप्रमाणे हवेत विरून तर जाणार नाही ना, असाही सवाल उपस्थित होत आहे.
‘त्यांची’ पूरती गोची
दरम्यान, मंत्रिमंडळ फेरबदलाच्या या वेळकाढू धोरणामुळे पूरती गोची झाली आहे ती बिचाऱ्या ‘त्या आठ जणांची’. भाजपमध्ये प्रवेश करताना ज्या आशा-आकांक्षा उराशी बाळगल्या होत्या त्यांचा चुराडाच झाल्याची त्यांची भावना बनली आहे. पैकी काहीजणांना निदान महामंडळे तरी मिळाली आहेत, संकल्प आमोणकर यांनी मिळालेले बालभवनही नाकारले होते. त्यामुळे सत्ताधारी पक्षात असूनही विरोधी गटातच असल्यासारखी त्यांची गत झाली आहे.
अशावेळी आता तो फेरबदलाचा मोहोळ उठला आहे तो सत्यात आल्यास त्यावेळी तरी आपणास लॉटरी लागेल अशी अपेक्षा त्यापैकी अनेकजण बाळगून आहेत. दुसऱ्या बाजूने खरोखरच फेरबदल झाल्यास काहीजणांना डच्चू मिळणार हे निश्चित आहे. त्यामुळे तशी शक्यता असलेल्या मंत्र्यांमध्ये निराशा पसरली असल्याचे वृत्त आहे.









