पथकामध्ये तीन अधिकाऱ्यांचा समावेश : पथक आणखी दोन दिवस बेळगावात सर्व्हे करणार
प्रतिनिधी/ बेळगाव
स्वच्छ सर्वेक्षण पथक अखेर शनिवारी सकाळी बेळगाव शहरात दाखल झाले असून त्यांच्याकडून शहराची पाहणी करण्यासह सर्व्हे केला जात आहे. सर्वेक्षणाच्या पहिल्या दिवशी अनगोळ, मजगाव, उद्यमबाग, क्लब रोड, चन्नम्मा सर्कल, कचेरी रोड, कंग्राळ गल्ली, शेट्टी गल्ली, भडकल गल्ली, खंजर गल्ली आदी ठिकाणी भेटी देऊन तेथील रस्ते, तलाव, उद्याने आदींची पाहणी करण्यात आली. पथकामध्ये तीन अधिकाऱ्यांचा समावेश असून हे पथक आणखी दोन दिवस बेळगावात वास्तव्य करून सर्व्हे करणार आहे.
दरवर्षी केंद्र सरकारच्या निर्देशानुसार देशातील विविध शहरांचे स्वच्छ सर्वेक्षण केले जाते. त्यानुसार स्वच्छ शहरांची यादी जाहीर करण्यात येते. 2024 मध्ये जाहीर झालेल्या सर्वेक्षणात बेळगाव शहर 198 व्या क्रमांकावर होते. सर्वेक्षणात बेळगाव शहराची घसरण होत आहे. त्यामुळे शहराला चांगले स्थान मिळावे यासाठी महापालिकेकडून प्रयत्न सुरू आहेत. गेल्या काही दिवसांपासून बेळगाव शहराचे स्वच्छ सर्वेक्षण करण्यासाठी पथक बेळगावला येणार होते. मात्र हे पथक शिमोग्याला गेल्याने बेळगावला येण्यास विलंब झाला. शनिवारी सकाळी बेळगावला येणार असल्याचे पथकाकडून शुक्रवारी सायंकाळीच बेळगाव महापालिकेला कळविले. सकाळी तीन अधिकाऱ्यांचा समावेश असलेले पथक बेळगावात दाखल झाले. त्यानंतर त्यांनी अनगोळ, मजगाव, उद्यमबाग, क्लब रोड, चन्नम्मा सर्कल, कचेरी रोड, कंग्राळ गल्ली, शेट्टी गल्ली, भडकल गल्ली, तसेच खंजर गल्लीत भेट देऊन पाहणी केली.
विशेषकरून पथकातील अधिकाऱ्यांनी उद्याने, रस्ते, तलाव आदींची पाहणी करण्यासह लोकांची मते आजमावली. हे पथक आणखी दोन ते तीन दिवस बेळगावात वास्तव्य करून सर्वेक्षण करणार आहे. त्यांच्यासोबत बेळगाव महापालिकेच्या आरोग्य विभागातील साहाय्यक पर्यावरण अभियंता आदिलखान पठाण, प्रवीणकुमार होते. ज्या भागात पथक सर्व्हेसाठी जात आहे, त्या भागातील आरोग्य निरीक्षकांना त्याठिकाणी बोलावून घेतले जात आहे.









