दहावी परीक्षा पूर्वतयारी बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा
प्रतिनिधी/ बेळगाव
दहावीची परीक्षा सुरळीत पद्धतीने पार पडेल, यासाठी प्रत्येक अधिकाऱ्याने प्रयत्न करावेत. परीक्षेदरम्यान कोणतेही गैरप्रकार होऊ नयेत, यासाठी सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. तसेच प्रत्येक परीक्षा केंद्रावर पोलीस बंदोबस्त असणार आहे. तरीदेखील कॉपीचे प्रकार घडल्यास कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिला आहे.
शनिवारी जिल्हा पंचायत कार्यालयात एसएसएलसी परीक्षेच्या तयारीसाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला जि. पं. सीईओ राहुल शिंदे, पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग, जिल्हाशिक्षणाधिकारी लीलावती हिरेमठ, डाएट प्राचार्य बसवराज नलतवाड उपस्थित होते. बेळगाव परिसरातील गटशिक्षणाधिकारी व केंद्र प्रमुखांना या बैठकीत मार्गदर्शन करण्यात आले.
जि. पं. सीईओ राहुल शिंदे म्हणाले, परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्यास आरोग्य यंत्रणा कार्यरत असेल. सध्या उष्णतेत मोठी वाढ झाली असल्याने परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांकडे लक्ष पुरविण्याच्या सूचना त्यांनी केल्या. जिल्हाशिक्षणाधिकारी लीलावती हिरेमठ यांनी परीक्षेसंदर्भात माहिती दिली. ट्रेझरी कार्यालयापासून केंद्रापर्यंत प्रश्नपत्रिकांची वाहतूक, त्याबरोबरच इतर सूचना त्यांनी केल्या. यावेळी शैक्षणिक जिल्ह्यातील बीईओ व केंद्र प्रमुख उपस्थित होते.
उद्या बेंगळूरच्या पथकाकडून पाहणी…
एसएसएलसी परीक्षेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. बसविण्यात आलेले सीसीटीव्ही योग्यप्रकारे कार्यरत आहेत की नाही? याची तपासणी करण्यासाठी सोमवार दि. 17 रोजी बेंगळूर येथील एका पथकाकडून तपासणी करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रत्येक परीक्षा केंद्रावर सोमवारी त्या-त्या शाळेने आपला टेक्निशियन हजर ठेवावा, अशा सूचना शाळांना करण्यात आल्या आहेत.









