वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
गतविजेते कोलकाता नाईट रायडर्स आगामी इंडियन प्रीमियर लीगच्या मोसमासाठी नवीन नेतृत्वाखाली सज्ज झाले असून जेतेपद राखण्याच्या दृष्टीने तयारी करू लागले आहेत. नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत नवा कर्णधार अजिंक्य रहाणे, मार्गदर्शक ड्वेन ब्राव्हो, मुख्य प्रशिक्षक चंद्रकांत पंडित आणि उपकर्णधार व्यंकटेश अय्यर यांनी आगामी हंगाम आणि संघाच्या तयारीबद्दल त्यांचे विचार मांडले.
विद्यमान विजेत्या संघाचे कर्णधारपद स्वीकारलेल्या रहाणेने या संधीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. या अद्भूत संघाचे नेतृत्व करणे ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. मला ही संधी दिल्याबद्दल मी व्यवस्थापनाचा आभारी आहे, असे रहाणेने म्हटले. या अनुभवी फलंदाजाने विजेतेपदाचे रक्षण करण्याचे आव्हान स्वीकारले आहे. आम्ही या हंगामात नक्कीच आमचे सर्वोत्तम योगदान देऊ, असे रहाणे पुढे म्हणाला.
रहाणेला त्याच्या फलंदाजीच्या स्थानाबद्दल विचारले असता, संघ प्रथम या मानसिकतेवर त्याने जोर दिला. संघाला मी जिथे खेळावे असे वाटते तिथे मी नेहमीच खेळत आलेलो आहे. सांघिक विचार नेहमीच प्रथम समोर ठेवलेला आहे, असे त्याने सांगितले. ड्वेन ब्राव्होने संघाची यशस्वी वाटचाल पुढे चालू ठेवण्याच्या दृष्टीने त्याच्या योजनांची रूपरेषा सांगितली. गेल्या हंगामातील काही चांगल्या गोष्टी बदलण्याचा प्रयत्न करणे माझ्या दृष्टीने चांगले ठरणार नाही, असे तो म्हणाला.
त्याने संघमालक शाहऊख खानसोबत काम करण्याबद्दलचा उत्साह देखील व्यक्त केला. शाहऊखसारखा बॉस असणे हे चांगले आहे ज्याने खेळामध्ये निश्चितपणे गुंतवणूक केली आहे. ती ऊर्जा आणि तो उत्साह मी येथे आणण्याचा प्रयत्न करणार आहे, असे त्याने सांगितले. उपकर्णधार व्यंकटेश अय्यरही ब्राव्होसोबत काम करण्यास उत्सुक आहे. अय्यरला मोठी किंमत मोजून करारबद्ध करण्यात आलेले आहे. ब्राव्हो हा इतिहासातील सर्वांत यशस्वी टी-20 खेळाडू आहे. त्यामुळे त्याच्याबरोबर भरपूर अनुभवही येतो, असे अय्यर म्हणाला.









