विंडीज-इंडिया मास्टर्स आज जेतेपदासाठी लढत
वृत्तसंस्था / रायपूर
2025 च्या आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीग वयस्करांच्या टी-20 स्पर्धेत येथे खेळविण्यात आलेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात दिनेश रामदीनचे अर्धशतक आणि अष्टपैलु कामगिरीच्या जोरावर विंडीजने श्रीलंकेचा 6 धावांनी पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. या स्पर्धेत इंडिया मास्टर्स संघाने उपांत्य फेरीत बलाढ्या ऑस्ट्रेलियाला नमवून अंतिम फेरी यापूर्वीच गाठली आहे. रविवारी येथे इंडिया मास्टर्स आणि विंडीज मास्टर्स यांच्यात जेतेपदासाठी लढत होईल.
शनिवारच्या उपांत्य सामन्यात लंका मास्टर्स संघाने नाणेफेक जिंकून विंडीज मास्टर्सला प्रथम फलंदाजी दिली. विंडीजने 20 षटकात 5 बाद 179 धावा जमवित लंकेला विजयासाठी 180 धावांचे आव्हान दिले. त्यानंतर श्रीलंका मास्टर्स संघाने 20 षटकात 9 बाद 173 धावा जमविल्याने त्यांना पराभव पत्करावा लागला.
विंडीज मास्टर्सच्या डावामध्ये ड्वेन स्मिथ लवकर बाद झाला. त्यानंतर विलीयम पर्किन्सने 24 तर लेंडल सिमॉन्सने 17 धावा जमविल्या. या जोडीने पॉवरप्लेमध्ये 43 धावांची भागिदारी केली. त्यानंतर लंकन संघातील गोलंदाजांनी पर्किन्स आणि सिमॉन्स यांना बाद केल्याने विंडीजची स्थिती 3 बाद 48 अशी केविलवाणी झाली होती. कर्णधार लाराने वॉल्टनसमवेत 60 धावांची महत्त्वपूर्ण भागिदारी केल्याने विंडीजला तीन अंकी धावसंख्या पार करता आली. वॉल्टनने 20 चेंडूत 31 धावा झळकविल्या. लंकेच्या गुणरत्नेने अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली. लाराने आपल्या खेळीमध्ये 33 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकार ठोकले आणि तो दुखापतीनंतर निवृत्त झाला. यष्टीरक्षक आणि फलंदाज दिनेश रामदीनने 22 चेंडूत 3 उत्तुंग षटकार आणि 4 चौकारांसह 50 धावा जमविल्याने विंडीजला 179 धावांपर्यंत मजल मारता आली.
प्रत्युत्तरादाखल खेळताना विंडीजच्या गोलंदाजीसमोर लंकेचे फलंदाज ठराविक अंतराने बाद झाल्याने त्यांना आक्रमक फलंदाजी करता आली नाही. विंडीजच्या बेस्टने दर्जेदार गोलंदाजी करत 4 गडी बाद केले. लंकेतर्फे गुणरत्नेने एकाकी लढत 42 चेंडूत 66 धावा जमविताना 1 षटकार आणि 7 चौकार नोंदविले. गुणरत्नेची ही खेळी अखेर वाया गेली. कर्णधार संगकारा 17 धावांवर बाद झाला. बेस्टने 3 चेंडूंच्या अंतराने लंकेचे दोन गडी बाद केले. त्याने थरंगा आणि थिर्मेनी यांचे बळी मिळविले.गुणरत्नेने 32 चेंडूत अर्धशतक झळकविले. टेलर आणि ड्वेन स्मिथ यांनी लंकेचे तळाचे फलंदाज लवकर गुंडाळले. प्रसन्नाने 9 तर डिसिल्वाने 1 धाव जमविली. लंकेची यावेळी स्थिती 6 बाद 97 अशी होती. गुणरत्नेला उदानाकडून बऱ्यापैकी साथ मिळाली. उदानाने 10 चेंडूत 21 धावा जमविताना गुणरत्नेसमवेत 39 धावांची भागिदारी केली. लंकेला शेवटच्या षटकात विजयासाठी 15 धावांची जरुरी होती. गुणरत्नेने या षटकातील पहिल्याच चेंडूवर षटकार खेचला. त्यानंतर पुढील चेंडूवर गुणरत्ने बाद झाल्याने लंकेचे सामन्यातील आव्हान संपुष्टात आले.
संक्षिप्त धावफलक: विंडीज मास्टर्स 20 षटकात 5 बाद 179 (दिनेश रामदीन नाबाद 50, लारा 41, गुणरत्ने 1-14), श्रीलंका मास्टर्स 20 षटकात 9 बाद 173 (गुणरत्ने 66, थरंगा 30, बेस्ट 4-27)









