सातारा :
दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास किल्ले अजिंक्यताऱ्याच्या खालच्या बाजूने लागलेला वणवा वाऱ्याच्या बेगाने गडावर पोहोचला. गडावर वणवा लागल्याचे समजताच शिवभक्त मोरेश्वर कांबळे हा एकाच वणवा आटोक्यात आणण्यासाठी आटापिटा करत होता. दरम्यान, तेथेच पालिकेच्यावतीने सुरू असलेल्या कामावरुन कामगारांनी जेवण सोडून वणवा आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. शहर पोलिसांना याची माहिती मिळताच पोलीसही पोहचले. अग्निशामक दलाचे कर्मचारी पोहचले.
किल्ले अजिंक्यताऱ्यावर दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास धुराचे लोट खाली सातारकरांना दिसत होते. हा वणवा दक्षिण बाजूकडून पेटत आला. दुपारच्या वाऱ्याच्या वेगाने हनुमान मंदिराच्या बाजूच्या गवताने पेट घेतला. झाडेही जळून गेली. आकाशवाणी केंद्राच्या समोरच्या परिसरातील गवत, झाडे झुडपे जळू लागली. त्याची माहिती मिळताच शिवभक्त मोरेश्वर कांबळे याने एकट्यानेच वणवा आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरु केला. मात्र, वाऱ्याच्या वेगापुढे एकटा वणवा आटोक्यात आणू शकत नाही. त्याच परिसरात पालिकेच्यावतीने सुरु असलेल्या फुटपाथच्या कामाचे कामगार तेथेच जेवण करत होते. त्यांना वणवा लागल्याचे सांगून त्यांना विनंती करताच वणवा आटोक्यात आणण्यासाठी तेही मदतीला शिवभक्ताच्या धावले. दरम्यान, शहर पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांना फोनवरुन याची माहिती देताच त्यांनीही पीसीआरची गाडी पाठवून दिली. तसेच अग्निशामक दलाची गाडीही तब्बल एक तासाने गडाच्या प्रवेशद्वाराच्या जवळ पोहचली. तोपर्यंत वणव्याने गवत, झाडे होरपळून त्याची राख रस्त्यावर आल्याचे दिसत होती.
- पर्यावरण प्रेमी एकही फिरकले नाहीत
शहरात अनेक पर्यावरण प्रेमी आहेत. त्यातील एकही पर्यावरण प्रेमी हा वणवा आटोक्यात आणण्यासाठी फिरकला नाही. दरम्यान, अजिंक्याताऱ्याच्या रस्त्यावर काही हुल्लडबाज तरुणतरुणी रंग बरसे खेळ खेळण्यात दंड होते. तर काही भर उन्हात किल्यावर भटकत होते. त्यांनीही वणवा विझवण्याचा प्रयत्न केला नाही.








