विटा :
केंद्र सरकारने राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील सर्व लाभार्थ्यांची ई–केवायसी करण्याच्या सूचना यापूर्वीच राज्य शासनाला दिल्या आहेत. त्यानुसार खानापूर तालुक्यात ई–केवायसी पूर्ण करण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. पात्र लाभार्थ्यांची ई–केवायसी तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना पुरवठा विभागाने दिल्या आहेत. मात्र अद्याप 35 हजार 208 लाभार्थ्यांनी अद्याप ई–केवायसी करणे प्रलंबित आहे. उर्वरित लाभार्थ्यांनी 31 मार्चपूर्वी ई–केवायसी पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन तहसीलदार योगेश्वर टोंपे यांनी केले आहे.
टोंपे यांनी दिलेली माहिती अशी, शिधापत्रिकेवर धान्याचा लाभ घेत असलेल्या प्राधान्य कुटुंब लाभार्थी आणि अंत्योदय अन्नयोजनेच्या लाभार्थ्यांना राज्य शासनाने ई– केवायसी बंधनकारक आहे. त्यासाठी 31 मार्चची अंतिम मुदत दिली आहे. या मुदतीत ई–केवायसी न करणाऱ्यांची शिधापत्रिकेवरून ऑनलाईन नावे वगळी जाणार आहेत. परिणामी त्यांना धान्याचा लाभ मिळणार नाही. मागील सहा महिन्यापासून पुरवठा विभाग त्यावर काम करीत आहे. मात्र खानापूर तालुक्यातील प्राधान्य कुटुंब लाभार्थी आणि अंत्योदय अन्नयोजनेतील 70.51 टक्के लाभार्थ्यांची ई–केवायसी पूर्ण आहे. तालुक्यात एक लाख 19 हजार 388 पात्र लाभार्थी आहेत. अद्याप 35 हजार 208 लाभार्थ्यांनी अद्याप ई–केवायसी करणे प्रलंबित आहे.
ही प्रकिया सुलभ करण्यासाठी केंद्राने मेरा ई केवायसी हे अॅप विकसित केले आहे. त्यासाठी लाभार्थ्यांनी अॅप मोबाईलमध्ये इन्स्टॉल करणे आवश्यक आहे. त्यामुळे मोबाईलवरून घरबसल्या स्वत:चे आणि कुटुंबातील इतर व्यक्तीची ई केवायसी पूर्ण करता येणार आहे.
- 31 मार्चपर्यंत ई–केवायसी पूर्ण करा
ई–केवायसी 31 मार्चपूर्वी पूर्ण करावे अन्यथा शिधापत्रिकेवरील धान्याचा लाभ बंद होण्याची शक्यता आहे. त्यासाठी धान्याचा लाभ घेत असलेल्या ज्या लाभार्थ्यांनी अद्याप ई–केवायसी प्रकिया पूर्ण केली नाही त्यांनी नजीकच्या स्वस्तधान्य दुकानात जाऊन ईपॉस मशीनवरून ई–केवायसी पूर्ण करून घ्यावी.








