चिपळूण :
शहरातील युनायटेड इंग्लिश स्कूल परिसरात भर महामार्गावर शुक्रवारी सकाळी मालवाहतुकीचा ट्रक बंद पडला. यावेळी एसटी बसेसना मार्गक्रमण करण्यासाठी पुरेशी जागा नसल्यामुळे या फेऱ्यांचा शिवाजीनगर बसस्थानकाकडूनचा मार्ग बदलत चक्क चिंचनाका मोर्गे करण्यात आला. अचानक करण्यात आलेल्या या बदलामुळे शिवाजीनगर बसस्थानकात बांबलेल्या प्रवाशांची मात्र फसगत झाल्याने कमालीच्या त्रासाला सामोरे जावे लागले. यामुळे शिवाजी नगर बसस्थानक प्रवाशांअभावी ओस पडल्याचे चित्र होते.
मध्यवर्ती बसस्थानकातून सोडण्यात येणाऱ्या मुंबई, पुणेसह खेड, दसपटी, पोफळी, सती, अनारी मार्गावरील एसटी फेऱ्या पुढे शिवाजी नगर बसस्थानकातून नियोजित प्रवासासाठी रवाना होत असतात. मात्र शुक्रवारी सकाळी शहरातील युनायटेड इंग्लिश स्कूल परिसरात मुंबईच्या दिशेकडे जाणारा एक मालवाहतुकीचा ट्रक भर महामार्गावर अचानकपणे बंद पडला. हा ट्रक सुरू व्हावा यासाठी प्रयत्न करुनही तो सुरू होत नव्हता. तोपर्यंत महामार्गावर काही प्रमाणात वाहतूक कोंडी झाली.
बंद ट्रकमुळे एसटी बसेसना पुढे जाण्यासाठी पुरेशी जागा नसल्यामुळे बसेस शिवाजी नगर बसत्त्थानकात येत नव्हत्या. यामुळे या बसेस शिवाजीनगर बसस्थानकात न आणता चिंचनाका मार्गे बहादूरशेख नाका येथे पाठवण्यात आल्या. मात्र सकाळच्यावेळी नेहमीप्रमाणे कामकाजासाठी बाहेर पडलेले नागरिक तसेच विद्यार्थी शिवाजीनगर बसस्थानकावर आले होते. फेऱ्या बसस्थनकात येत नसल्याबाबत त्यांना काहीच कल्पना नव्हती.
अखेर आगाराकडून माहिती मिळाल्यानंतर त्यांनी आगार प्रशासनाप्रती संताप व्यक्त करत मध्यवर्ती बसस्थानक गाठले. दरम्यान, महामार्गावर बंद पडलेला मालवाहतुकीचा ट्रक एका बाजूला करण्यात आल्यानंतर पुन्हा बसेस नियमित मार्गाने सुरू झाल्याने प्रवाशांनी निश्वास टाकला.








