पणजी : गुरुवारी संध्याकाळी होलिका दहन कार्यक्रम पार पाडल्यानंतर शुक्रवारी रंगपंचमी उत्सवानिमित्त राज्यातील विविध भागात रंगांची उधळण करण्यात आली. राज्यातील अनेक शहरांमध्ये डीजेच्या तालावर गाणी लावून रंगपंचमी उत्सवाचा आनंद साजरा करण्यात आला. पणजीची ग्रामदेवता श्री महालक्ष्मी देवीची ओटी देवस्थान समितीचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपे यांच्या प्रमुख उपस्थित भरण्यात आली. यावेळी श्रीनिवास धेंपे यांनी एकमेकांना रंग लावून होळीच्या शुभेच्छा दिल्या. भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, महापौर रोहित मोन्सेरात, उपमहापौर संजीव नाईक, माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर, उत्पल पर्रीकर आदीं उपस्थित होते.
देवीचे दर्शन घेतल्यानंतर मान्यवरांनी रोमटामेळ घेऊन शिगमोत्सव समिती आझाद मैदानावर पोचताच गाण्याच्या तालावर धुलीवंदनला सुरवात झाली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी आझाद मैदानावरील कार्यक्रमात भाग घेतला. पणजीतील आझाद मैदानावरील रंगोत्सवात लहान मुले, युवक, युवतीपासून अबाल वृद्धांनी भाग घेऊन रंगांची उधळण केली. राज्यातील अनेक वाड्यांवर युवक, लहान मुले ताशांच्या गजरात एकमेकांना रंग लावताना दिसून आले. राजधानी पणजीतील ताळगाव, मेरशी, सांताक्रुझ, शिरदोण, सांतआंद्रे, चिंबल, बांबोळी याशिवाय रायबंदर आदी भागात पारंपरिक होळी उत्सव साजरा करण्यात आला.
पणजीतील आझाद मैदानावरील रंगोत्सव हा सर्वांसाठी खुला असल्याने त्याला परंपरिक महत्त्व आहे. माजी मुख्यमंत्री स्व.मनोहर पर्रीकर यांनी आझाद मैदानावर रंगोत्सवाताल सुरवात केली होती. या परंपरेमध्ये खंड पडलेला नाही. रंगोत्सवाचा आनंद लुटताना अनेकांनी डिजेच्या तालावर ठेका धरला. ठिकठिकाणी मोठे स्पीकर लावण्यात आले होते. टँकरद्वारे पाण्याचे फवारे मारून अनेकांनी रेन डान्सचा आनंद लुटला. आझाद मैदानावर देखील सांगितीक कार्यक्रम घेण्यात आला. गायिकांनी गायलेल्या लाईव्ह गाण्यावर लोक थिरकत होते. युवक, युवती, महिला तसेच लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांनीही रंगपंचमीत सहभागी होऊन होळीचा आनंद लुटला. दुपारी तीन वाजेपर्यंत राज्यातील अनेक भागात रंगोत्सवाचा कार्यक्रम सुरू होता.









