कौन्सिल विभागाकडून तयारी पूर्ण : दुपारी 1 वाजता होणार मुख्य प्रक्रिया
बेळगाव : 23 व्या महापौर-उपमहापौर पदासाठी आज शनिवार दि. 15 रोजी महानगरपालिकेच्या मुख्य सभागृहात निवडणूक होणार आहे. यासाठी कौन्सिल विभागाकडून आवश्यक ती सर्व तयारी करण्यात आली असून सकाळी 9 पासूनच निवडणूक प्रक्रिया सुरू होणार आहे. दुपारी 1 वाजता निवडणुकीची मुख्य प्रक्रिया पार पडणार आहे. प्रादेशिक आयुक्त संजीव शेटेण्णावर यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक होणार असून महापालिकेत बहुमत असलेल्या भाजपकडेच महापौर व उपमहापौरपद राहणार, हे मात्र निश्चित आहे.
महापौर-उपमहापौर निवडणूक लांबल्याने अनेकांच्या नजरा या निवडणुकीकडे लागून राहिल्या होत्या. प्रादेशिक आयुक्त संजीव शेटेण्णावर यांनी 5 मार्च रोजी आदेश बजावत 15 मार्चला निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. तेव्हापासून आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणुकीसंबंधी सर्व माहिती यापूर्वीच कौन्सिल विभागाकडून प्रादेशिक आयुक्त कार्यालयाकडे पाठविली होती. मात्र, दरम्यानच्या काळात अनेक नाट्यामय घडामोडी घडल्याने कौन्सिल विभागाला वारंवार पक्षीय बलाबल आणि मतदारांची माहिती प्रादेशिक आयुक्त कार्यालयाला पाठवावी लागली.
प्रादेशिक आयुक्तांनी जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार शनिवारी दुपारी 1 वाजता निवडणूक होणार आहे. सकाळी 9 ते 11 पर्यंत महापौर-उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल करण्यास वेळ आहे. त्यानंतर 1 वाजता निवडणूक प्रक्रिया राबविली जाणार आहे. त्यामध्ये एकापेक्षा अधिक अर्ज आल्यास मतदान घेण्यात येणार आहे. एकच अर्ज आल्यास बिनविरोध निवड घोषित करण्यात येईल. याबाबत कौन्सिल विभागाकडून आवश्यक ती सर्व तयारी करण्यात आली असून यापूर्वी सर्व मतदारांना नोटीस पाठविण्यात आली आहे. तर नगरसेवक जयंत जाधव व मंगेश पवार यांना शुक्रवारी निवडणुकीसंबंधी नोटीस पाठविण्यात आली आहे.
मतदार असे…
- सत्ताधारी गटाचे नगरसेवक-37
- विरोधी गटाचे नगरसेवक-21
- खासदार-2
- आमदार-4
- विधान परिषद सदस्य-1
- एकूण मतदार-65
आरक्षण व निवडणूक वेळ
- महापौरपदाचे आरक्षण-सामान्य
- उपमहापौरपदाचे आरक्षण-सामान्य महिला
- अर्ज दाखल करण्याची वेळ-सकाळी 9 ते 11 वा.
प्रादेशिक आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली बैठक दुपारी 1 वा.
निवड प्रक्रिया अशी…
उपस्थित असलेल्या सदस्यांची हजेरी
कोरम पडताळणी
अर्ज पडताळणी
दाखल झालेल्या अर्जांची घोषणा
अर्ज माघार घेणे
रिंगणातील उमेदवारांची घोषणा
बिनविरोध झाल्यास निकाल घोषणा
एकापेक्षा जास्त उमेदवार असल्यास हात उंचावून मतदान
मतमोजणी व निकाल









