सकाळपासूनच भाविकांची दर्शनासाठी गर्दी : यात्रेत योग्य नियोजन
वार्ताहर/कडोली
हजारो भाविकांच्या उपस्थितीत गुंजेनहट्टी येथील जागृत देवस्थान श्री होळी कामण्णा देवालयाचा यात्रोत्सव शुक्रवारी मोठ्या उत्साहात पार पडला. देवस्थान पंच कमिटी आणि पोलिसांच्या योग्य नियोजनामुळे यात्रा शांततेत पार पडली. सालाबादप्रमाणे धुलीवंदनानिमित्त होळी कामाण्णा देवालयाचा यात्रोत्सव आयोजित करण्यात आला होता. यात्रेच्या पार्श्वभूमीवर सदर देवालयाचा धार्मिक विधी गुरुवारपासून सुरू झाला आहे. वाजत गाजत आणि गुलालाच्या उधळणीत होळी मंदिराकडे आणली गेली. गोड नैवैद्य दाखवून होळीची पूजा केली. शुक्रवारी पहाटे पुजाऱ्यांच्या आणि हक्कदारांच्या उपस्थितीत होळीची पूजा करण्यात आली. त्यानंतर होळी कामण्णा देवालयाची पूजा करून अभिषेक घालण्यात आला आणि सकाळी 10 वाजता गाऱ्हाणे घातल्यानंतर भर यात्रेला सुरुवात झाली.
सकाळपासूनच भाविकांनी उपस्थिती दर्शवून देवालयाचे दर्शन घेतले. दिवसभर बेळगाव जिल्ह्dयासह कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा राज्यातून मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थिती दर्शविली होती. देवस्थान पंचकमिटी आणि काकती पोलीस ठाण्याच निरीक्षक सुरेश शिंगे, उपपोलीस निरीक्षक मंजुनाथ हुलगुंद आणि सहकारी यांच्या योग्य नियोजनामुळे यात्रा सुरळीत आणि शांततेत पार पडण्यास मदत झाली. मंदिर परिसरापासून जवळपास एक किलो मीटर अंतरापर्यंत वाहनांना आत प्रवेश दिला गेला नाही. त्यामुळे भाविकांची गैरसोय झाली नाही. केदनूर, कडोली आणि देवगिरी गावच्या सिमेवर वाहन पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती.
दिवसभर थ्रीफेज वीजपुरवठा
शिवाय विद्युत महामंडळाकडून यात्रेसाठी खास दिवसभर थ्रीफेज विद्युत पुरवठा ठेवण्यात आला होता. तसेच देवस्थान पंच कमिटीच्यावतीने पाणीपुरवठ्यासाठी पाणी टँकरची व्यवस्था केली. त्यामुळे यात्रेत पाणीटंचाई जाणवली नाही. देवस्थान पंच कमिटीने मंदिरासमोर भव्य मंडप उभारला होता. मंदिराला आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली होती. तर पाळणे, खेळण्यांच्या दुकानांनी यात्रा परिसर फुलून गेला होता. केदनूर, मण्णिकेरी, कडोली गावच्या बसेस कडोलीपर्यंत धावत होत्या. तर देवगिरी, बंबरगा, कट्टणभावी गावच्या बसेस होनगामार्गे सोडण्यात आल्या होत्या. वाहनांना आत प्रवेश नसल्याने भाविकांना एक किलो मीटर अंतरापर्यंत चालत जावून देवालयाचे दर्शन घ्यावे लागले. गेले वर्षभर बालून दाखविलेला नवस या भर यात्रेस सर्व भाविकांनी फेडला. मंदिरापासून जवळपास एक किलो मीटर अंतरापर्यंत संपूर्ण परिसर भाविकांनी फुलून गेला होता. यात्रेच्या मुख्य दिवशी यात्रा शांततेत पार पडण्यासाठी भाविकांनी सहकार्य केल्याने देवस्थान पंचकमिटीने सर्वांचे आभार मानले. यात्रेची सांगता रंगपंचमी दिवशी धार्मिक विधी पार पडल्यानंतर होणार आहे.









