केएससीए थर्ड डिव्हीजन क्रिकेट स्पर्धा
बेळगाव : कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना व धारवाड विभागीय क्रिकेट संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने थर्ड डिव्हीजन क्रिकेट स्पर्धेत शुक्रवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यातून चॅलेंजर युथ स्पोर्ट्स क्लबने विजया क्रिकेट अकादमीचा 9 गड्यांनी तर युनियन जिमखानाने बेळगाव स्पोर्ट्स क्लबचा 153 धावांनी पराभव करुन प्रत्येकी 4 गुण मिळविले. गणेश कंग्राळकर, अनिकेत लोहार यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
युनियन जिमखाना मैदानावरती खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात जिमखानाने प्रथम फलंदाजी करताना 29 षटकात 7 गडी बाद 243 धावा केल्या. सुमित भोसले 60, अक्षय जुवेकर 58, गणेश कंग्राळकर नाबाद 36, मिलिंद चव्हाण 14 धावा केल्या. बेळगावतर्फे प्रवीण करडे 3, नारायण मजुकरने 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना बेळगाव स्पोर्ट्सचा डाव 18 षटकात 90 धावांत आटोपला. आर्यन गवळी 20, प्रवीण करडेने 14, अथर्व दिवटे 15 व नारायण मजुकरने 13 धावा केल्या. जिमखानातर्फे रोहीत पोरवालने 4, प्रितीम सीबीने 3 तर राहुल नाईकने 1 गडी बाद केला.
दुसऱ्या सामन्यात विजया क्रिकेट अकादमीने प्रथम फलंदाजी करताना 17.4 षटकात सर्वगडी बाद 66 धावा केल्या. विनायक बाचीकर 16, प्रशांत चौगुलेने 13 तर नमन ओऊळकरने 15 धावा केल्या. चॅलेंजर्सतर्फे अनिकेत लोहारने 4, प्रथमेश लोहार 3, शुभम चव्हाणने 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना चॅलेंजर्स युथने खेळताना 9 षटकात 1 गडी बाद 67 धावा करुन सामना 9 गड्यांनी जिंकला. आरव पी. नाबाद 23, शुभम नागेश नाबाद 22, अभिनवने 17 धावा केल्या. विजयातर्फे नमन ओऊळकरने 1 गडी बाद केला.









